सोलापूर: सोलापूर पोलिसांनी बस स्थानकावर (Solapur Bus Stand) महिला प्रवाशांचे सोने लुटणाऱ्या महिलेस अटक केली आहे. (Woman arrested at solapur bus stand). आयेशा युसूफ शेख (वय 33 वर्ष,रा समाधान नगर, सोलापूर) असं ताब्यात घेतलेल्या महिलेचे नाव आहे. पोलीस चौकशी नंतर त्या महिलेने आपला गुन्हा कबुल केला. पोलिसांनी तिच्या कडून एकूण साडेबारा तोळे वजनाचे 5 लाख 29 हजार 670 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. सध्या ती न्यायालयीन कोठडीत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
महिला प्रवाशांच्या सोन्याची लूट: गेल्या काही दिवसांत सोलापूर बस स्थानकावर महिला प्रवाशांच्या सोन्याची चोरी वाढली होती. फौजदार चावडी पोलीस ठाण्याचे डीबी पथक महिला प्रवाशांना लुटणाऱ्या महिलेचा तपास करत होते. 21 ऑक्टोबर रोजी अश्विनी गोपाळ पाटील (वय 34 वर्ष,रा. गणेश नगर, सोलापूर) या दिवाळी निमित्ताने माहेरी जात होत्या. एसटी स्टॅण्ड वर बस मध्ये चढताना अज्ञात महिलाने त्यांचे सोन्याचे दागिने लंपास केले. याबाबत अश्विनी पाटील यांनी 21 ऑक्टोबर रोजी फौजदार चावडी पोलीस ठाणे येथे फिर्याद दिली होती. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली आणि एका संशयीत महिलेस ताब्यात घेतले.
गरीबीमुळे चोरीचा धंदा सुरू केला: आरोपी आयेशा शेख हीच्या म्हणण्यानुसार तिने गरीब परिस्थिती मुळे चोरीच्या धंदा चालू केला. तिला एकूण सहा अपत्य आहेत आणि त्यांची सारी जबाबदारी तिच्यावरंच आहे. ती बुरखा घालून बस मध्ये चढण्याचे नाटक करायची आणि गर्दीचा फायदा उचलून महिला प्रवाशांच्या पर्सवर डल्ला मारायची. सोलापूर पोलीस गेल्या अनेक दिवसांपासून तिच्या मागे होते.
खबऱ्यामार्फत लावला पोलिसांनी शोध: फौजदार चावडी पोलीस ठाण्याचे डीबी पथकातील एपीआय शंकर धायगुडे यांनी आपल्या खबऱ्यांमार्फत आयेशा शेखचा शोध लावला. आयेशा शेख चोरीचे सोने विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती खबऱ्यांनी पोलीसांना दिली होती. तिची अधिक चौकशी केली असता तिने अनेकदा बस मध्ये गर्दीचा फायदा घेत चोरी केल्याची कबूली दिली. कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवण्यासाठी ती हा धंदा करत असल्याचे तिने सांगितले. कोर्टात हजर केले असता कोर्टाने तिला पोलीस कोठडी सुनावली होती.