सोलापूर - यंदाची लोकसभा निवडणूक ही विकासाच्या आधारे, जनसंपर्काच्या, गोरगरिबांच्या कल्याणाच्या आधारे झालेली नसून जातीपातीच्या मुद्द्यावर झाली आहे. परंतु याही परिस्थितीत काँग्रेस पक्ष सक्षमपणे मात करेल. शिंदे साहेबांनी आजपर्यंत जनतेची सेवा केली. कार्यकर्त्यांना ताकद दिली. त्याचे फळ आपल्याला नक्की मिळेल, असा विश्वास काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केला आहे.
यावेळी शिंदे यांनी, ये सफर बहोत है कठीण, ना उदास हो मेरे हमसफर, के है अगले मोड पर मंजीले, नही रहनेवाली मुश्कीले, मेरी बात पर यकीन कर, ना उदास हो मेरे हमसफर, अशी शायरी करत कार्यकर्त्यांचा उत्साह वाढविला.
शनिवारी सोलापूर शहर जिल्हा काँग्रेस समिती पदाधिकारी, कार्यकर्त्यांची बैठक काँग्रेस भवन सोलापूर येथे शहराध्यक्ष प्रकाश वाले यांनी आयोजित केली होती. या बैठकीस आमदार प्रणिती शिंदे, माजी आमदार निर्मलाताई ठोकळ, माजी खासदार धर्मण्णा सादुल, माजी आमदार प्रकाश यलगुलवार, गटनेते चेतन नरोटे, माजी महापौर संजय हेमगड्डी यांच्यासह इतर प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी आमदार प्रणिती शिंदे, काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून मतदार नोंदणी, आरोग्य शिबीर व जनतेच्या हिताचे कार्यक्रम राबवावेत, असे म्हणाल्या. येणाऱ्या काळात जनतेच्या प्रश्नावर आंदोलन उभे करून जातीधर्मांत फूट पाडणाऱ्या विचारांच्या विरोधात आपली लढाई सुरूच राहील. शेवटी सत्याचाच विजय होतो. पुन्हा संघटित होऊन लढूया. सत्ता असो वा नसो सदैव जनतेच्या सेवेत राहू. आम्ही खचनार नाही पुन्हा जिंकून दाखवू, असा विश्वास आमदार प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केला. त्यांचे हे वक्तव्य काँग्रेस कार्यकर्त्यांना ऊर्जा देणारं ठरल्याची चर्चा काँग्रेस कार्यकर्त्यांत सुरू होती.