सोलापूर- देहू-आळंदीहून पंढरपूरला वारीला निघालेल्या दिंड्यांमध्ये अनेक खेळ खेळले जातात. त्यापैकीच एक म्हणजे रिंगण सोहळ्यातील अध्यात्मिक खेळ. या खेळांना वारकऱ्यांच्या पायी प्रवासात मोलाचं स्थान आहे. म्हणून रिंगण सोहळा संपल्यानंतर प्रत्येक पालखी तळावर वारकरी हे मनोरंजनाचे खेळ खेळले जातात.
रिंगणात धावा पार करून तळावर फुगड्या खेळणाऱ्या महिला वारकऱ्यांना संसाराची ना चिंता आहे, ना कुटुंबाची त्या वारीचा आनंद घेतात. वारीत आल्यावर त्यांना एकच माहीत असते विठ्ठल-रुक्मिणीचे नामस्मरण करणे आणि पंढरपुरात दर्शन घेणे. त्यासाठी त्या वर्षनुवर्षे पायी पंढरीला जातात. मग पायी प्रवासाचा शिण जावा म्हणून त्या बालपण जागृत करणारे विविध खेळ खेळतात. त्यामध्ये टाळ, मृदंग, तुळशी वृदांवन, ठेका, फुगडी, हातावरच्या फुगड्या, झिम्मा फुगडी, तीन फुगडी, भोई फुगडी, कमरेवर हात ठेवून ताल, असे नयनरम्य खेळात वारकरी रमतात. वारी असो कि वारीतील विविध खेळ यामध्ये गरीब-श्रीमंत, स्त्री-पुरुष, तरूण-वृद्ध असा कोणताच भेदभाव नसतो.
पायी प्रवास करून थकल्यानंतर वारकरी रिंगणस्थळी विसावा घेतात. त्याच ठिकाणी सर्व दिंड्यातील वारकरी एकत्र येतात. हरी नामाचा गजर करतात. रिंगण सोहळा संपल्यानंतर मनोरंजनाचे हे असे खेळ सुरू होतात.