पंढरपूर (सोलापूर) - पंढरपुरातील कट्टर हिंदुत्ववादी विचारसरणीचे आणि भागवताचार्य म्हणून प्रसिद्ध असलेले वासुदेव नारायण उर्फ वा.ना. उत्पात यांचे करोनामुळे निधन झाले आहे. ते 80 वर्षांचे होते. पुण्यातील दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यांच्या पश्चात चार मुली, मुलगा, सून, नातवंडे असा परिवार आहे.
वा.ना. उत्पात यानी पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सदस्य म्हणून काम केले आहे. विठ्ठल मंदिरात 25 वर्षे त्यांनी श्रीमद भागवत कथा आणि रुक्मिणी स्वयंवर कथेचे वाचन केले आहे. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या साहित्याचा त्यांनी सखोल अभ्यास केला. तसेच सावरकर साहित्याचा प्रसारही केला. सावरकरांच्या विचाराचे साहित्य संमेलन सुरू करण्याची संकल्पना त्यांचीच होती. त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदही भुषविले होते. वा.ना. उत्पात हे पंढरपूरच्या समाजकारण, राजकारण व आध्यात्म क्षेत्रातील प्रमुख नाव असून पंढरपूर नगरपरिषदेचे नगराध्यक्षपदही त्यांनी भुषविले होते.
पंढरपूरमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर वाचनालयाची स्थापना केली व भागवत कथा सांगून यातून मिळालेल्या उत्पन्नातून भव्य वास्तू व क्रांती मंदिराची उभारणी केली. याच वाचनालयात त्यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर अभ्यासिकेची निर्मिती करून गोरगरीब विद्यार्थ्यांना अभ्यासाची सोय देखील केली होती. आणीबाणीमध्ये दीड वर्षे ते तुरुंगवासात होते. तसेच साप्तहिक प्रहारचे ते संपादक होते. त्यांनी विविध विषयावर तब्बल 18 पुस्तके लिहिली आहेत.
दरम्यान, कोरोनाने पंढरपूरचे मोठे नुकसान केले असून यापूर्वी माजी आमदार सुधाकपंत परिचारक, राष्ट्रवादीचे नेते राजू पाटील, ह.भ.प. रामदास महाराज जाधव (कैकाडी), भाजपचे शहराध्यक्ष संजय वाईकर यांचे देखील या आजाराने निधन झाले आहे.
हेही वाचा - शेतकऱ्यांसाठी सोलापूर बाजार समिती उभारणार 50 बेडचे कोव्हिड केअर सेंटर