पंढरपूर - विठ्ठल रूक्मिणीमाता प्रक्षाळ पुजा निमीत्त विठ्ठल व रूक्मिणीमातेच्या मंदिरात विविध रंगबेरंगी फुलांची आकर्षक आरास करण्यात करण्यात आली होती. ही आरास पुणे येथील विठ्ठल भक्त अमोल शेरे यांनी केली आहे. शेरे हे गेली अनेक वर्षे विठ्ठलाची सेवा करत आहेत.
कार्तिक वारी झाल्यानंतर श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचा शिनवटा काढण्याची अनेक वर्षाची परंपरा आहे. त्याला प्रक्षाळ पूजा असे म्हणतात. त्यानिमित्ताने श्री विठ्ठल रुक्मिणीमातेचा गाभारा, सोळखांबी, नामदेव पायरी, सभामंडप, अशा विविध भागाना ऑर्चिड, कार्नेशन, गुलाब, जरबेरा, मोगरा ,कामिनी , तुळशी, झेंडू, शेवंती, आष्टर, गुलाब, तगर,जाई जुइ अशा विविध फुलांनी आकर्षक पध्दतीने सजवण्यात आले आहे. या पंधरा प्रकारच्या फुलांमध्ये सावळा विठुराया आणि रुक्माई मातेचे रूप अधिकच खुलून दिसत आहे. विठ्ठल आणि रुक्माईमातेच्या मनोहरी पोषखात सावळ्या विठुरायाचे सौंदर्य आणखीन नयनरम्य दिसत आहे. भाविकाना हे देवाचे देखणे रुप मोहित करीत आहे.
२८ नोव्हेंबर पासून श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे मुखदर्शन सुरू करण्यात आले आहे. मुखदर्शनाची संख्या ३०००करण्यात आली आहे. ५ डिसेंबर पासून पंढरपूर येथील स्थानिक नागरिकांना रोज सकाळी सहा ते सात यादरम्यान विठ्ठलाचे मुखदर्शन घेता येणार आहे.