सोलापूर - कंकणाकृती सूर्यग्रहणामुळे पंढरीच्या विठ्ठलाला जलस्नान घालण्यात आले. ग्रहणाच्या काळात दीड तास विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन बंद ठेवण्यात आले होते. बुधवारी सायंकाळी सूर्यास्तापासून ग्रहणाचे वेध लागले होते. त्यामुळे श्री विठ्ठलाचे नित्योपचारात बदल करण्यात आल्याने देवाला बुधवारपासून सुका मेव्याचा नैवैद्य दाखवण्यात आला होता.
हेही वाचा - ...असे पार पडले या वर्षातील अखेरचे ग्रहण
आज संपूर्ण भारतभर सूर्यग्रहण दिसत असतानाच पंढरपूरमध्ये श्री विठ्ठलाला ग्रहण काळाचे वेध लागले असताना स्नान अभिषेक करण्यात आले. चंद्रभागेचे पवित्र जल आणून विठ्ठलाला स्नान अभिषेक करण्यात आला.
सकाळी ८ वाजून ५ मिनिटांनी ग्रहण काळाचे वेध लागले असताना ग्रहणस्पर्श स्नानासाठी विठ्ठल- रुक्मिणीचे दर्शन सुमारे दीड तास बंद ठेवण्यात आले. विठ्ठल- रुक्मिणीला नेहमीप्रमाणे जलस्नान अभिषेक करण्यात आला व नंतर भाविकांसाठी दर्शन खुले करण्यात आले.
हेही वाचा - तामिळनाडूमध्ये मुसळ उखळात ठेवून घेतला सूर्यग्रहणाचा अंदाज, जुन्या काळात केला जायचा वापर
सकाळी ११ वाजता ग्रहण सुटल्यानंतर स्नान करण्यासाठी विठ्ठल -रुक्मिणीचे दर्शन बंद ठेवण्यात आले होते. त्यानंतर १ वाजता नैवेद्य दाखवून विठ्ठलाचे नित्योपचार व दर्शन नेहमीप्रमाणे सुरू करण्यात आले. यासंदर्भातली माहिती मंदिर समितीचे व्यवस्थापक बालाजी पूदलवाड यांनी दिली आहे.