सोलापूर- गुढी पाडव्याच्या दिवशी पंढरपुरातील श्री विठ्ठल रुक्मिणीचे मंदिर सोनचाफ्याच्या फुलांनी सजविण्यात आले. विठ्ठल रुक्मिणी मंदिर भाविकांना दर्शनासाठी बंद करण्यात आले आहे. तरीही, आज मराठी नवीन वर्षानिमित्त आकर्षक अशी फुलांची सजावट करण्यात आली.
कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या पंढरीच्या पांडुरंगाचे मंदिरही दर्शनासाठी बंद करण्यात आले आहे. गुढीपाडव्याला मंदिरात दर्शनासाठी कोणीही येणार नाही याची माहिती असताना देखील मंदिरामध्ये सोनचाफ्यांच्या फुलांची सजावट करण्यात आली. आत्तापर्यंत सजावटीसाठी कोणीतरी दाता भेटत असे. मात्र, दर्शनासाठीच कोणी येत नसल्यामुळे मंदिर समितीचे मुख्य कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांनी स्वखर्चातून 150 किलो सोनचाफा मुंबईहून मागविला. त्यानंतर ही फुलांची आकर्षक अशी सजावट केली. गुढी पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर मंदिरामध्ये भागवत धर्माची पताका फडकविण्यात येते. यावर्षी देखील मंदिरात ध्वज पूजा करण्यात आली. सकाळी साडे नऊच्या सुमारास ही ध्वज पूजा पार पडली.