मुंबई - मुंबईकरांनो यंदाचा म्हणजेच वर्ष 2025 चा जगातील रोमँटिक शहरांचा रिपोर्ट आला असून, आपल्या मुंबईने यात देशात प्रथम क्रमांक पटकावलाय. तर जगात मोस्ट रोमँटिक शहरांत मुंबई 49 व्या स्थानावर आहे. पाहायला गेल्यास मुंबई शहराला मोठा इतिहास आहे. हे शहर देशाची आर्थिक राजधानी असलं तरी इथे येणाऱ्या पर्यटकांची संख्यादेखील तितकीच आहे. त्यामुळे सुट्टीच्या दिवसातही या देशातील सर्वात रोमँटिक शहरात फिरण्याचा प्लॅन असेल किंवा आपल्या प्रिय व्यक्तीसोबत निवांत वेळ घालवण्यासाठी रोमँटिक जागा शोधत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे.
1) मरिन ड्राईव्ह : मुंबईतील आणि मुंबईत पर्यटक म्हणून येणाऱ्या जोडप्यांसाठी मरिन ड्राईव्ह हे एक आवडते ठिकाण आहे. आपण एक तरी फोटो मरिन ड्राईव्हवर काढावा, अशी अनेक जोडप्यांची इच्छा असते. मरिन ड्राईव्ह कुठे आहे? तिथे कसे जातात? याची माहीत नाही, अशी फार कमी जोडपी असतील. तरी देखील आम्ही सांगतो की, तुम्हाला मरिन ड्राइवर जायचं असेल तर चर्चगेट स्थानकातून तुम्ही अगदी चालत दोन मिनिटांच्या अंतरावर हे ठिकाण आहे. तिथे अनेक जण आपल्या प्रिय व्यक्तीसोबत सूर्यास्ताचा आनंद घेण्यासाठी येत असतात. शुक्रवार, शनिवार, रविवार म्हणजे वीकेंडच्या दिवसात इथे नाईट आऊटसाठी कपल्सची मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली दिसते. तुम्ही जर आतापर्यंत मरिन ड्राईव्ह पाहिले नसेल तर एकदा अवश्य भेट द्या, असे हे ठिकाण आहे.
2) गेट वे ऑफ इंडिया : जर तुम्हाला तुमच्या जोडीदारासोबत काही हटके करायचे असेल तर गेटवे ऑफ इंडिया तुमच्यासाठी बेस्ट पर्याय आहे. इथे तुम्हाला हॉटेल ताज, अथांग समुद्र, सुंदर असा सूर्यास्त अशा सर्व गोष्टी एन्जॉय करता येतील. सोबतच तुम्हाला तुमच्या प्रिय व्यक्तीसोबत बोटिंग करायची असेल तर त्याचादेखील पर्याय इथे उपलब्ध आहे. ही राईड जोडप्यांना खूप आवडते. बोटीतून प्रवास करताना तुम्हाला शांत समुद्र आणि झगमगती मुंबई, बोटीवर घिरट्या घालणारे परदेशी पक्षी, अशी सुंदर दृश्य पाहता येतात. पण यात एका गोष्टीची नोंद तुम्हाला घ्यावी लागेल ती म्हणजे या परदेशी पक्ष्यांना अनेक जण प्रेमाने खायला घालतात. मात्र, तसे करण्यास कायद्याने बंदी आहे. त्यामुळे याची काळजी मात्र तुम्ही नक्की घ्या. तुम्हाला गेटवे ऑफ इंडियाला भेट द्यायची असल्यास छत्रपती शिवाजी टर्मिनस आणि चर्चगेट स्थानकावरून एसी बसेस उपलब्ध आहेत. ज्या तुम्हाला सहा रुपयांमध्ये गेटवे ऑफ इंडियाला सोडतील.
3) गिरगाव चौपाटी : गिरगाव चौपाटी जोडप्यांसाठी एक बेस्ट ऑप्शन आहे. गिरगाव चौपाटीचे प्रशासकीय नाव फार कमी लोकांना माहिती आहे. गिरगाव चौपाटीला स्वराज्य भूमी, असेदेखील म्हणतात. मुंबईतील सर्वात प्रतिष्ठित समजला जाणारा लालबागचा राजा, मुंबईचा राजा, चिंचपोकळीचा चिंतामणी हे सर्व मानाच्या गणपतींचं इथेच विसर्जन केले जाते. त्यामुळे या चौपाटीला एक विशेष महत्त्व आहे. पण इतर वेळी सुट्टीच्या दिवसात इथे मोठ्या प्रमाणात लोकांची गर्दी झालेली पाहायला मिळते. इथे खाऊ गल्ली, लहान मुलांना खेळण्यासाठी गार्डन, ज्येष्ठ नागरिकांसाठी नाना-नानी पार्क, इतर ऍक्टिव्हिटीसाठी घोडे, वाळवंटातील गाड्या, असे सर्व पर्याय उपलब्ध आहेत. त्यामुळे आपल्या परिवारासोबत किंवा प्रिय व्यक्तींसोबत तुम्ही येथे नक्की भेट देऊ शकता.
4) बँडस्टँड, वांद्रे : बँडस्टँड हा वांद्रे येथील समुद्रकिनाऱ्यालगतचा खडकाळ मार्ग आहे. ज्याला हँगआऊट स्पॉट आणि जॉगर्स पार्क म्हणूनही ओळखले जाते. बँडस्टँड बहुतेक जोडप्यांचे आवडते ठिकाण आहे. मुंबईत सुट्टीसाठी आला असाल तर बँडस्टँडच्या खडकाळ दगडांवर बसून थोडा वेळ घालवू शकता. यातील अनेक जोडप्यांचे प्रेक्षणीय स्थान म्हणजे प्रसिद्ध अभिनेता शाहरुख खानचा मन्नत बंगलादेखील इथेच आहे. तुम्ही जर नशीबवान असाल तर तुम्हाला संध्याकाळच्या वेळेत शाहरुख खानचे दर्शन होऊ शकते. तुम्हाला इथे जायचे असल्याने डायरेक्ट रिक्षा, शेअर रिक्षा आणि बस असे सर्व पर्याय आहेत.
5) जुहू चौपाटी : जुहू चौपाटी हे मुंबईकरांसाठी खास ठिकाण आहे. संध्याकाळी तुम्ही समुद्र किनाऱ्यावर बसून आपल्या पार्टनर सोबत निवांत वेळ घालवू शकता. जर तुम्हाला तुमच्या जोडीदारासोबत चांगला वेळ घालवायचा असेल, तर तुम्ही इथे सूर्यास्ताचा आनंद घेण्यासाठी किंवा उंट सफारी, घोडे स्वारी अशा सर्व ऍक्टिव्हिटी तुम्ही जुहू चौपाटीवर करू शकता. सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुम्ही आणि तुमचा जोडीदार दोघेही फुडी असाल तर इथे तुम्ही गेलंच पाहिजे. तसं पाहायला गेल्यास मुंबईत जोडप्यांना निवांत वेळ घालवता यावा, यासाठी अनेक ठिकाणं आहेत. पण या गर्दीच्या शहरात एक जागा निवडणे अवघड जाते. आज या बातमीच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला मुंबईतील काही फोटोजेनिक आणि रोमँटिक ठिकाणांबद्दल सांगितलंय. त्यामुळे तुम्ही यापैकी कोणतेही एक उत्तम ठिकाण निवडू शकता आणि तुमच्या जोडीदारासोबत बाहेर जाऊ शकता.
हेही वाचा -