सोलापूर(पंढरपूर) - नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी पंढरपूरमधील श्री विठ्ठल आणि रुक्मिणी मंदिरात झेंडूच्या फुलांची आरास करण्यात आली आहे. यामुळे विठ्ठल-रुक्मिणीच्या मूर्तींसह गाभारा आकर्षक दिसत आहे.
श्री विठ्ठल मंदिरात सेवा करण्याबाबत आळंदी येथील प्रदिप ठाकूर यांच्या कुटुंबाने कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी व व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांच्याकडे इच्छा व्यक्त केली होती. त्यानुसार ठाकूर यांना नवीनवर्षाच्या सुरुवातीला मंदिरात सजावट करण्याची संधी दिली. त्यानुसार त्यांनी विठ्ठल-रुक्मिणी मातेचा गाभारा झेंडू, जरबेरा, शेवंती, गुलछडी या फुलांनी सजावला. या सजावटीसाठी एक हजार टन फुलांचा वापर करण्यात आला आहे.
नवीन वर्षानिमित्त पंढरपुरात गर्दी -
नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी पंढरपूरमध्ये भाविकांनी गर्दी केली. श्री. विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या दर्शनासाठी राज्यातून भाविक पंढरपूरमध्ये दाखल होत आहेत. वर्षाच्या पहिल्या दिवशी पंढरीतील नामदेव पायरी, महाद्वार, चौफळा, स्टेशन रोड याठिकाणी भाविकांनी गर्दी केली आहे. पंढरपुरातील भक्त निवास, लॉज, मठ हे भाविकांनी हाऊसफुल झाले आहेत. ज्या भाविकांचे ऑनलाईन बुकिंग आहे, त्यांना विठुरायाच्या मुक्त दर्शनाचा लाभ घेता येत आहे.