पंढरपूर -श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्यावतीने दीपावली आणि लक्ष्मीपूजनानिमित्त आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे. विठ्ठल-रुक्मिणी मंदिराचा गाभारा या आकर्षक फुलांच्या सजवटीने खुलून दिसत आहे. श्री विठ्ठल व श्री रुक्मिणीमातेच्या गाभाऱ्यात व मंदिरात लाल व पिवळ्या जरबेरा फुलाची सुंदर व मनमोहक अशी आरास करण्यात आली आहे.
जरबेरा फुलांची आरास -
देशभरात दीपावली, लक्ष्मीपूजन सण मोठ्या उत्साहात साजरे केले जात आहेत. राज्यातील प्रमुख तीर्थक्षेत्रांपैकी असणाऱ्या श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीने दीपावली, लक्ष्मीपूजन निमित्त लाल व पिवळ्या जरबेरा फुलांनी संपूर्ण मंदिर आकर्षक सजवले आहे. देवाचा गाभारा, सोळाखांबी मंडप, चौखांबी मंडप या फुलांमुळे सुंदर व मनमोहक दिसत आहेत.
मंदिराचे महाद्वार उघडले मात्र, भाविकांना प्रवेश नाही -
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 17 मार्चपासून बंद असलेले श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिराचे दिवाळी निमित्ताने संत नामदेव पायरीजवळील महाद्वार (पितळी दरवाजा) दिवाळीच्या निमित्ताने उघडण्यात आले आहेत. अद्याप श्री विठ्ठल - रुक्मिणी मंदिर भाविकांसाठी खुले करण्यात आले नसले तरी महाद्वार उघडले गेल्यामुळे भाविकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दक्षता म्हणून श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर भाविकांसाठी बंद करण्यात आले आहे. तेव्हापासून संत नामदेव पायरीजवळील मंदिराचे महाद्वार देखील बंद ठेवण्यात आले होते. चंद्रभागा नदीवर स्नान करून भाविक जेव्हा महाद्वार घाटावरून श्री विठ्ठल मंदिराकडे येतात, तेव्हा याच महाद्वाराचे दर्शन भाविकांना होत असते.
सविस्तर वाचा - दिवाळीनिमित्त श्रीमंत दगडूशेठ हलवाई मंदिराबाहेर पणत्यांची आकर्षक आरास