सोलापूर - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंढरपुरात चैत्री वारीसाठी येणाऱ्या भाविकांनी गर्दी न करण्याचे आवाहन श्री विठ्ठल रुख्मिणी मंदिर समितीचे सह-अध्यक्ष हभप गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी केले आहे. आज (बुधवार) धूप आरतीनंतर विठ्ठलाचे मंदिर हे दर्शनासाठी बंद करण्यात येणार आहे. मंदिर जरी बंद असले तरी देवांचे नित्योपचार सुरू राहतील, असे औसेकर महाराज यांनी सांगितले आहे.
हेही वाचा - सोलापूर जिल्ह्यातील धार्मिक देवस्थाने बंद; मंदिरातील नित्योपचार राहणार सुरूच
कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमी नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये. यासाठी गर्दी टाळण्याठी राज्यातील शाळा, महाविद्यालय तसेच चित्रपटगृह बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या पंढरीच्या विठ्ठलाच्या दर्शनासाठी हजारो भाविक दररोज येत असतात. त्यामुळे मंदिरातील दर्शन बंद करण्याबाबत मागील काही दिवसांपासून चर्चा सुरू होती. मात्र, मंगळवारी सायंकाळच्या धूप आरतीनंतर मंदिर दर्शनासाठी बंद करण्याचा निर्णय मंदिर समितीच्यावतीने घेतल्याची माहिती औसेकर महाराज यांनी पत्रकार परिषदेत दिली.
हेही वाचा - कोरोनासंदर्भात अफवा पसरवणाऱ्यावर गुन्हा दाखल
यावेळी मंदिर समितीचे सदस्य संभाजी शिंदे, शकुंतला नडगिरे, नगराध्यक्षा साधना भोसले, प्रांत अधिकारी सचिन ढोले, कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी, व्यवस्थापक बालाजी पुदलवाड हे उपस्थित होते. श्री विठ्ठल-रूक्मिणी मंदीर बंद करण्याबाबत 18 मार्चला मंदिर समितीची बैठक होणार होती. परंतू कोरोनाचा वाढता प्रदुर्भाव पाहून 17 मार्चला (मंगळवार) विठ्ठल रुक्मिणी मंदिर बंद करण्यात आले आहे. याबाबत जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी लेखी आदेश मंदिर प्रशासनाला दिला आहे. मंदिर 31 मार्च पर्यंत बंद राहणार आहे. या कालावधीमध्ये देवाचे नित्योपचार पूजा सुरू राहणार असल्याचे औसेकर यांनी सांगितले.
हेही वाचा - अक्कलकोटसह सिद्धेश्वर मंदिरही राहणार बंद; जिल्हाधिकाऱ्यांची माहिती
दरम्यान, येत्या काही दिवसावर चैत्री एकादशी आली आहे. चैत्री वारीसाठी लाखो वारकरी हे पंढरपूरात विठ्ठलाच्या दर्शनासाठी येत असतात. मात्र, सध्या कोरोनाची परिस्थिती लक्षात घेता राज्यातील तसेच राज्याबाहेरील वारकऱ्यांनी पंढरपुरात येऊन गर्दी करू नये, असे आवाहनही मंदिर समितीच्यावतीने करण्यात आले आहे.