सोलापूर : सोलापुरातील हजारोंच्या संख्येने ख्रिश्चन समाज रस्त्यावर उतरले आहे. ख्रिश्चन समाजावर होत असलेला अत्याचार अन्याय थांबवा, भारतातील अनेक चर्चवर हल्ले होत आहेत. हे हल्ले थांबवा, अशी मागणी करीत, सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील ख्रिश्चन धर्मगुरू, ख्रिश्चन बांधव, भगिनी, मोठ्या संख्येने या 'मूक मोर्चा'त सहभागी झाले होते. सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हा विराट मोर्चा दाखल झाला होता. सोलापूर येथील सर्व चर्च मंडळींनी या 'मूक मोर्चा'त सहभाग घेतला होता.
ख्रिश्चन समाजाबाबत प्रमुख घटना : छत्तीसगड राज्यात चर्चची तोडफोड करण्यात आली. देशात रोज कुठे ना कुठे, अशा घटना समोर येत आहेत. सांगली आटपाडी या ठिकाणी धर्मांतराच्या संशयावरून ख्रिश्चन धर्मगुरूवर हल्ला करण्यात आला. आळंदी येथे ख्रिश्चन बांधवांना प्रार्थना करण्यासाठी अटकाव करण्यात आला. रायगड जिल्ह्यातील नागोराठाणे या गावी धर्मग्रंथ जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला. सांगोला येथे धर्मगुरूंना दमदाटी करण्यात आली.
ख्रिश्चन समाजावर होत असलेल्या अन्यायाबाबत 'महामूक मोर्चा' : ख्रिश्चन समाजावर होत असलेल्या अन्यायाबाबत महामूक मोर्चा काढण्यात आला. सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील ख्रिश्चन समाज या महामूक मोर्चात सहभागी झाले होते. यावेळी धर्मगुरू विकास रणशिंगे यांनी माहिती देताना सांगितले की, ख्रिश्चन समाजावरील हल्ले थांबवा, अन्यथा शांतताप्रिय ख्रिश्चन समाज आक्रमक होईल, असे सांगितले. आज हजारो बांधव रस्त्यावर उतरले आहेत. पुढे भविष्यात लाखो ख्रिश्चन बांधव रस्त्यावर येतील, असे धर्मगुरू यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ख्रिश्चन बांधवांची गर्दी : सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयात पहिल्यांदाच ख्रिश्चन बांधव इतक्या मोठ्या संख्येने दाखल झाले होते. सदर बाजारात पोलिसांनी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला होता. यावेळी दी फर्स्ट चर्चचे धर्मगुरू विकास रणशिंगे, फादर हायस्कूल चर्चचे धर्मगुरू लुईस डीमेलो, द मेथोडीस्ट चर्चचे धर्मगुरू देवदास बेळी, हिंदुस्थानी चर्चचे इमान्यूएल म्हेत्रे, नवीन उपासना मंदिरचे धर्मगुरू सचिन पारवे यांनी यावेळी भाषण करून विविध मागण्या केल्या. भाषणे झाल्यानंतर शांततेची प्रार्थना करण्यात आली. राष्ट्रगीत पठण करून महामूक मोर्चाच समारोप करण्यात आला.