पंढरपूर (सोलापूर) - माळशिरस तालुक्यातील वेळापूर येथे कोरोनाचा प्रादुर्भाव असतानाही धुमधडाक्यात वाढदिवस जल्लोष साजरा करणे पोलीस कर्मचाऱ्याला चांगलेच महागात पडले आहे. वेळापूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक जाधव यांच्यासह 25 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलिसाने कोरोनाच्या नियमाचे उल्लंघन केल्याने वेळापूर पोलीस ठाण्यात कार्यरत असणारे महेश पोरे यांनी याबाबत तक्रार दिली आहे. या प्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक जाधव, वाढदिवस असणारे विनोद साठे, गौरीहर गुरव, विशाल उर्फ मल्हारी नाईकनवरे, अंकुश साठे, वैभव बनसोडे, असलम आतार, महेश नाईकनवरे, राहुल नाईकनवरे यांच्यासह उपस्थित असणाऱ्या वीस जणांवर गुन्हा दाखल करण्यात आले.
समाज माध्यमातून व्हिडीओ व्हायरल
वेळापूर येथील पालखी चौकामध्ये वेळापूर पोलीस चौकीमध्ये कार्यरत असणारे विनोद साठे यांचा वाढदिवस होता. एपीआय दिपक जाधव आणि २५ जणांनी डीजे लावून तालावर नाचत असल्याचा व्हिडीओ समाज माध्यमातून व्हायरल झाला. त्यानंतर वेळापूर पोलिसांनी या व्हिडिओच्या आधारे वाढदिवस असलेल्या विनोद साठे या पोलिसासह सहभागी सहाय्यक पोलीस निरीक्षक दिपक जाधव आणि २५ जणांवर गुन्हा दाखल केला. ही माहिती विभागीय पोलीस अधिकारी नीरज राजगुरू यांची दिली. या पोलिसांसह पंचवीस जणांवर मास्क न वापरणे, सोशल डिस्टन्सिंग पालन न करणे, बेकायदेशीरपणे जमाव जमवणे तसेच 143,188 व 269 कलमाखाली कारवाई करण्यात आली आहे.