पंढरपूर (सोलापूर) - पंढरपूर पोटनिवडणूकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या सभेत कोरोना नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी आयोजक विजयसिंह देशमुख यांच्यावर पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पंढरपूर मंगळवेढा पोटनिवडणूकीचे उमेदवार भगीरथ भालके यांच्या प्रचार सभेचे आयोजन करण्यात आले होते. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व राज्यमंत्री दत्ता मामा भरणे यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत पंढरपूर तालुक्यातील रांझणी येथे सभा घेण्यात आली. यावेळी कोरोना नियमाचे उल्लंघन केल्याप्रकरणी राष्ट्रवादी तालुकाध्यक्षांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केल्याची माहिती पुढे आली आहे. या सभेत अनेक कार्यकर्त्यांच्या तोंडाला मास्क नसल्याने, सोशल डिस्टंसिंगच्या नियमाचे पालन करण्यात न आल्याने ही कारवाई करण्यात आल्याची माहिती आहे.
जयंत पाटलांनीही काढला होता मास्क
याच प्रचार सभेत अनेक कार्यकर्ते विना मास्क असल्याने आणि वारंवार मास्क लावण्याचे सांगितल्यानंतरही कार्यकर्त्यांनी ऐकले नाही. यावेळी कार्यकर्त्यांना समजावून सांगण्यासाठी मंत्री जयंत पाटील यांनी मास्क काढत भाषण केले होते.
हेही वाचा-मिशन 'ब्रेक दि चेन'.. लॉकडाऊन व निर्बंधाबाबत नियमावली जाहीर, काय राहणार सुरू व काय होणार बंद ?