सोलापूर - रणजितसिंह मोहिते-पाटलांपाठोपाठ त्यांचे वडील राष्ट्रवादीचे खासदार विजयसिंह मोहिते-पाटील आज (बुधवारी) पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश करणार, असे तर्क लावले जात होते. मात्र, विजयसिंहांनी भाजप प्रवेश न करता आपली भूमिका अस्पष्ट ठेवली आहे.
काँग्रेस-राष्ट्रवादीच्या राजकीय वारसदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. मात्र, या युवा नेत्यांच्या वडीलधाऱ्यांनी मात्र भाजपपासून चार हात दूर राहणेच पसंत केले आहे. नगरच्या सुजय विखेंनी भाजपमध्ये प्रवेश करत उमेदवारी मिळवली. परंतु त्यांचे वडील आणि राज्य विधानसभेतील काँग्रेसचे विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे-पाटलांनी भाजपमध्ये प्रवेश केला नाही. त्याचीच पुनरावृत्ती आज अकलूजमध्ये पाहायला मिळाली.
माजी खासदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी ऐन निवडणूकीच्या तोंडावर राष्ट्रवादीला राम राम ठोकून भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांच्या पाठोपाठ राष्ट्रवादीचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंहही भाजपमध्ये जातील, असा अंदाज लावला जात होता. मात्र, आज तसे काही घडले नाही.