सोलापूर - करमाळा शहरात बँक ऑफ महाराष्ट्रचा स्लॅब कोसळून झालेल्या अपघातातील जखमींना तात्काळ मदत करावी, अशी मागणी माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. त्यांनी आज (शुक्रवारी) अपघातातील जखमींची भेट घेतली. तसेच करमाळ्याचे आमदार नारायण पाटील यांनी देखील जखमींना मदतीची मागणी केली आहे.
विजयसिंह मोहिते-पाटील यांनी आज करमाळा शहरात अपघात झालेल्या घटनास्थळाला भेट दिली. यावेळी त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना फोनवरून संपर्क साधून घटनेत जखमी झालेल्यांना तात्काळ मदत करण्यात यावी, अशी मागणी केली. तसेच घटनेत दोषी असणांऱ्यावर देखील तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी आमदार नारायण पाटील यांनी केली आहे. बँकेने विम्याची रक्कम लवकर मिळवुन द्यावी याबाबतही नारायण पाटील यांनी सूचना दिल्या आहेत.
बुधवारी करमाळ्यात महाराष्ट्र बँकेचे छत कोसळल्यानंतर माढा तालुक्यातील भोसरे येथील प्रशांत बागल व खडकेवाडी येथील लोचना गुंजाळ यांचा मृत्यू झाला होता. दोघांच्या घरची परिस्थीती बेताची असुन या दोन्ही कुटुंबावर मोठे संकट आले आहे. त्यामुळे प्रशासनाने तात्काळ पावले उचलत मदतनिधी उपलब्ध करावा अशा सुचना मोहिते पाटील यांनी दिल्या. तसेच बँकेत आत जाऊन घटनेची माहिती घेतली. यावेळी तहसिलदार सुशीलकुमार बेल्हेकर, पोलीस निरिक्षक श्रीकांत पाडुळे यांच्याशी त्यांनी चर्चा केली.
यावेळी डॉ. अमोल घाडगे यांनी घटनेची संपुर्ण हकीकत विजयसिंह मोहिते पाटील यांच्या समोर मांडली. तर बँकेच्यावतीने काढण्यात आलेल्या विम्याची रक्कम कधीपर्यंत पोहचेल व त्यासंदर्भात वेगाने पावले उचलावीत अशा सुचना मोहिते पाटील यांनी यावेळी दिल्या. तसेच जिल्हाधिकारी भोसले यांच्याशी फोनवर संवाद साधत संबंधित रुग्ण व मृत कुटुंबीयांना मदत पुरवण्याची विनंतीही मोहिते पाटील यांनी केली.