पंढरपूर (सोलापूर) - वेळापूर येथील आंतरराष्ट्रीय जलतरणपटू सुयश नारायण जाधवची यंदाच्या अर्जुन पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. नोव्हेंबर २०१८मध्ये पोलंड येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय जलतरण स्पर्धेत सुयशला रौप्यपदक मिळाले होते. पुरूषांच्या ५० मीटर बटरफ्लाय प्रकारात त्याने ही कामगिरी नोंदवली होती. सुयशला महाराष्ट्र शासनाचा शिवछञपती पुरस्कारही मिळाला आहे.

लहानपणीच दोन्ही हात गमावलेल्या सुयशने राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय अशा दोन्ही स्तरावर १२५ पदके मिळवली आहेत. घराच्या गच्चीवर पतंग उडवताना सुयशला विद्युत तारेला स्पर्श झाला होता. या घटनेनंतर, काळे पडलेले दोन्ही हात कापावे लागतील, असे मुंबईतील डॉक्टरांनी सांगितले. या सल्ल्यामुळे सुयशचे वडील नारायण जाधव व आई सविता जाधव यांच्या पायाखालची जमीन सरकली. मात्र, त्यांनी जिद्द सोडली नाही. सुयशला वाचवण्यासाठी त्यांनी 'कठीण' निर्णय घेतला.

दोन्ही हात अर्धे कापल्यानंतरही सुयशचे आंतराष्ट्रीय खेळाडू बनवण्याचे स्वप्न हवेत विरले नाही. दोन्ही हाताने अपंग असतानाही सुयशला जलतरण र्स्पधेसाठी तयार करण्यात आले. त्याने राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे नाव गाजवले.
अर्जुन पुरस्काराच्या निवडीबद्दल चांदापुरी साखर कारखान्याचे चेअरमन उत्तमराव जानकर, जि.प. सदस्य बाळासाहेब धाईंजे, सुजीतबापू कदम, महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ. सुभाष कदम यांच्यासह वेळापूर ग्रामस्थांनी सुयशला शुभेच्छा दिल्या आहेत.