सोलापूर - दुष्काळाचे चटके आता भाजीपाला बाजारपेठेतही जाणवू लागले आहेत. दुष्काळी परिस्थितीत शेतात उत्पन्नच न झाल्यामुळे बाजारात देखील आवक कमी होताना दिसत आहे. मंगळवारी पंढरपुरातील बाजारात फक्त ३ हजार पिशव्या कांद्याची आवक झाली आहे. कांद्याची आवक कमी झाल्याने दरात वाढ झाली.
मागील काही महिन्यांपासून निच्चांकी पातळीवर गेलेल्या कांद्याच्या दराने उसळी घेतली आहे. पंढरपूरमधील कृषी उत्तन्न बाजार समितीमध्ये मंगळवारी चांगल्या प्रतीच्या कांद्याला २ हजार रूपये क्विंटल एवढा दर मिळाला. मागील वर्षभरानंतर कांद्याला हा उच्चांकी दर मिळाल्याने शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.
यावर्षी दुष्काळी परिस्थिती असल्याने काद्यांसह भाजीपाल्याची आवक कमी झाली आहे. बाजारात आवक घटल्याने आणि मागणी वाढल्याने कांद्याचे भाव वाढले आहेत. पंढरपूर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सुमारे ३ हजार पिशव्यांची आवक झाली. कमी प्रतीच्या कांद्याला ७०० ते ८०० रुपये तर चांगल्या प्रतीच्या कांद्याला २ हजार रुपयांचा भाव मिळाला.