पंढरपूर - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनच्या प्रतिबंधक उपाययोजना केल्या जात असताना, आंदोलन करून जमाव गोळा करणे, मास्क न घालणे, सुरक्षित अंतर न ठेवणे यांचे पालन न केल्याप्रकरणी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर, विश्व वारकरी सेनेचे अरुण महाराज बुरघाटे, आनंद चंदनशिवे यांच्यासह 1,200 जणांविरोधात पंढरपूर पोलीस स्टेशनमधे सोमवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सोमवारी पंढरपूर येथे विठ्ठल-रुक्मिणी मंदीर दर्शनासाठी खुले करावे, अशी मागणी करत वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकरांनी आंदोलन केले होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी जमाव एकत्र न आणण्याचा आदेश दिलेला असतानाही आंदोलनात मोठ्या प्रमाणात लोक सहभागी झाले होते. त्यामुळे याप्रकरणी प्रकाश आंबेडकर, अरुण महाराज, आनंद चंदनशिवे (सोलापुर), धनंजय वंजारी, अशोक सोनवणे, रेखा ताई ठाकूर, नाम महाराज, बबन शिंदे, सागर गायकवाड, माऊली हलनवर (पंढरपूर), रवि सर्वगोड, गणेश महाराज शेटे (अकोला) यांच्यासह 1,200 नागरिकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जमावाने एकत्र येणे, मास्क न घालणे, सुरक्षित अंतर न ठेवणे यांचे पालन न केल्यामुळे या सर्व जणावर गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत पोलीस हवालदार परशुराम माने यांनी पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गायकवाड करत आहेत.