पंढरपूर (सोलापूर) - वारकरी सांप्रदायाचे आराध्य दैवत श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर दर्शनासाठी खुले करण्याची मागणी वंचित बहुजन आघाडी आणि विश्व वारकरी सेनेकडून करण्यात आली आहे. या मागणीसाठी आज पंढरपुरात आंदोलन करण्याचा इशारा वंचित आणि वारकरी सेनेकडून देण्यात आला होता. या आंदोलनाच्या दृष्टीने वारकरी आणि कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात पंढरपुरात दाखल होत आहेत. वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर पंढरपुरात येणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर आज पंढरपुरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
कोरोना महामारीला प्रतिबंध घालण्यासाठी देशभरातील धार्मिकस्थळे दर्शनासाठी बंद करण्यात आली होती. त्यानंतर देश अनलॉक होत असताना देशातील काही महत्वाची मंदिरे दर्शनासाठी खुली करण्यात आली आहेत. मात्र राज्यात कोरोना प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात असल्याने राज्य सरकारने अद्याप मंदिरे खुली करण्यास परवानगी दिलेली नाही. मात्र, वंचित आघाडी आणि विश्व वारकरी सेनेने राज्यातील धार्मिक स्थळे खुली करण्याची मागणी केली आहे. याच मागणीसाठी प्रकाश आंबेडकर यांनी ३१ ऑगस्टला पंढरपुरात आंदोलन करण्याचा इशारा दिला होता.
या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सोलापूर ग्रामीण पोलिसांनी पंढरपुरात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. कोणताही अनुचित प्रकार होऊ नये म्हणून विठ्ठ्ल मंदिर परिसरात बॅरिकेट लावण्यात आली आहेत. काही मार्गावरील चेक पोस्ट उभे करण्यात आले आहेत. या आंदोलना दरम्यना कोरोनाचा प्रसार होणार नाही याची खबरदारी पोलीस प्रशानसाकडून घेतली जाणार आहे. आजच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शहरात शहरात पोलिसांचा मोठा फौज फाटा तैनात करण्यात आला आहे. मंदिराकडे येणाऱ्या सर्व रस्त्यांवर लोखंडी बॅरेकेडिंग लावण्यात आले आहेत. जवळपास 500 ते 600 पोलिसांचा फौजफाटा पंढरपुरात तैनात असणार आहे. विशेष म्हणजे आदोलकांची मोठी संख्या जिल्ह्याभरातून दाखल होत आहे.
आंदोलनादरम्यान एसटी बसची तोडफोड होऊ नये म्हणून पंढरपूर आगारातील एसटी बसेस बंद राहणार आहेत. पंढरपूरमध्ये प्रशासनाने विशेष खबरदारी घ्यायला सुरुवात केली आहे. विठ्ठल मंदिराकडे जाणारे सर्व रस्ते प्रशासनाकडून सील करण्यात आले आहेत.
प्रकाश अंबेडकर सोलापुरहून पंढरपुरात दाखल -
पंढरपूर येथे विठ्ठल मंदिर दर्शनासाठी खुले करण्याची मागणी करत आज पंढरपुरात आंदोलन केले जाणार आहे. यासाठी भारिपचे नेते प्रकाश अंबेडकर हे देखील सोलापूरहून पंढपरपूरला दाखल होतील. त्यानंतर ते 11 वाज़े पर्यंत विठ्ठल मंदिराकडे जाण्याची शक्यता कार्यकर्त्यांकडून सांगितली जात आहे.