सोलापूर- गेल्या ५ महिन्यापासून कुलूपबंद असलेले ग्रामदैवत सिद्धेश्वर मंदिर खुले करण्याची मागणी होत होती. या मागणीसाठी सोलापूर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आज सकाळी ११ च्या सुमारास आंदोलन करण्यात आले. यावेळी तगडा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. आंदोलना नंतर वंचितच्या कार्यकर्त्यांना पोलिसानी ताब्यात घेतले.
हर्रर्र बोला...हर्रर्र च्या जय घोषात आज आंबेडकर चौक, पार्क चौक, सिद्धेश्वर मंदिर परिसर दणाणून गेले होते. वंचित बहुजन आघाडीचे नेते व कार्यकर्त्यांनी पंढरपूरच्या विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या धर्तीवर सोलापूरचे ग्रामदैवत शिवयोगी सिद्धरामेश्वर मंदिर दर्शनासाठी खुले करण्याच्या मागणीसाठी आंबेडकर चौक ते सिद्धेश्वर मंदिर अशी रॅली काढली. वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश प्रवक्ते नगरसेवक आनंद चंदनशिवे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे नगरसेवक तथा शहराध्यक्ष गणेश पुजारी व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
गेल्या ५ महिन्यांपासून सिद्धेश्वर मंदिर बंद आहे. दर्शनापासून अनेक भाविक वंचित आहे. सिद्धेश्वरांच्या दर्शनासाठी महाराष्ट्र राज्य, कर्नाटक, आंध्र प्रदेश या राज्यातून मोठ्या प्रमाणात भाविक सोलापुरात दाखल होतात. परंतु, कोरोनामुळे शहरातील व पर राज्यातील भाविक भयभीत आहेत. ही भीती आणि कोरोनाची चिंता दूर व्हावी ही वंचित बहुजन आघाडीची अपेक्षा आहे. मंदिरात गेल्याने अथवा तिथे डोळे मिटून ध्यान केल्याने मनातील भीती दूर होण्यास मदत होते. नियम, अटी घालून दिल्यास मंदिर खुले करण्यास काहीच हरकत नाही, असे नगरसेवक आनंद चंदनशिवे म्हणाले.
दरम्यान, वंचितच्या वतीने आंदोलन होणार असल्याने आज सकाळपासूनच मंदिर परिसराकडे जाणारे रस्ते पोलिसांनी बंद केले होते. सकाळी अकराच्या सुमारास डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात कार्यकर्ते जमले. त्यापैकी १० ते १५ जणांना मंदिरापर्यंत सोडण्यात आले. सिद्धेश्वर महाराज यांच्या फोटो पूजनानंतर कार्यकर्त्यांनी सिद्धरामेश्वराचा जयघोष केला. नंतर नगरसेवक आनंद चंदनशिवे, नगरसेवक पुजारी यांच्यासह सर्वांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यानंतर आंदोलन संपले.
हेही वाचा- सोलापुरात मोबाइलविनाही शिक्षण, कामगारांच्या मुलांसाठी उभारलीय शैक्षणिक भिंत