सोलापूर Unseasonal Rain In Solapur : सोलापूर शहरासह जिल्ह्यात मुसळधार पावसामुळं नाल्यात वाहून गेल्यानं तरुणाचा मृत्यू झाला. कुंभार वेस परिसरातील नाल्यात सलाम साबीर दलाल (वय 35, रा. जोडभावी पेठ, सोलापूर) हा तरुण वाहून गेल्याची घटना घडली आहे. सकाळी अवकाळी पावसाचा जोर वाढला असताना सलाम दलाल दुचाकीवरून घरी जात होता. मात्र, कुंभार वेस येथील नाल्यातून त्याची दुचाकी घसरल्यानं सलाम वाहून गेला. तसंच राज्यात मका, गहू, द्राक्षे, ज्वारी आदी पिकांचं अतोनात नुकसान झालंय. त्यामुळं शेतकरी अधिकच अडचणीत सापडला आहे.
स्थानिक प्रशासना विरोधात संताप : नाल्यात वाहून गेलेल्या तरुणाचा मृतदेह पाहून कुटुंबियांना दुःख अनावर झालं होतं. बुधवारी सकाळी पोलिसांनी पंचनामा करून शवविच्छेदनासाठी त्याचा मृतदेह शासकीय रुग्णालयात पाठवला. त्यामुळं नातेवाईकांसह त्याच्या मित्रांनी शासकीय रुग्णालयात गर्दी केली होती. या घटनेचा सोलापुरातील सामाजिक संघटनांनी स्थानिक प्रशासना विरोधात संताप व्यक्त केला आहे. तसंच शवविच्छेदन कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करत जिल्हा प्रशासनाला धारेवर धरलं होतं.
सोलापूरमध्ये अवकाळी पावसाचं थैमान : सोलापूरमध्ये अवकाळी पावसानं थैमान घातलं आहे. मंगळवारी सायंकाळपासून सोलापूर शहर, जिल्ह्यात अवकाळी पावसाला सुरुवात झाली. मात्र रात्री अकरा वाजल्यापासून मुसळधार पाऊस सुरू झाला. पावसामुळें शहरातील सखल भागातील घरांमध्ये पाणी शिरल्याच्या घटना घडल्या आहेत. सोलापूर शहरात सुमारे दोन तास मुसळधार पाऊस सुरू होता.
कृषी उत्पन्न बाजार समितीला पावसाचा फटका : सोलापुरात मंगळवारी सायंकाळी सातनंतर अवकाळी पावसाला सुरुवात झाली. त्यामुळं सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीला पावसाचा मोठा फटका बसला असून त्यात मोठ्या प्रमाणात कांद्याचं नुकसान झालं आहे. कांद्याची आवक वाढल्यानं कांद्याचं भाव आधीच घसरले आहेत. त्यातच पावसात भिजल्यानं कांद्याचे भाव पडण्याची भीती व्यक्त होत आहे. गेल्या तीन दिवसांपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण असून ठिकाणी अवकाळी पावसानं हजेरी लावलीय. यामुळं पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय.
हेही वाचा -