सोलापूर - लोकसभेच्या निवडणुकीतील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार प्रकाश आंबेडकर यांच्याविरोधातील राजकारणामुळं बहुजन समाज पार्टीत दोन गट पडले आहेत. एका गटाने आंबेडकर भाजपला पूरक भूमिका घेत असल्याचा आरोप करत विरोध दर्शविला आहे. तर दुसरीकडे महानगरपालिकेतील गटनेते आनंद चंदनशिवे यांनी प्रकाश आंबेडकर यांच्या उमेदवारीचे समर्थन करताना पक्षाला फेरविचार करण्याची मागणी केली आहे.
बाबासाहेब यांच्या विचारधारेतून बहुजन समाज पक्ष उभा राहिला पण त्यांच्या घराण्यातील व्यक्तीच्या विरोधात बसपा उमेदवार देत असेल तर ते योग्य होणार नाही. आंबेडकर यांच्या विरोधात उमेदवार देऊ नये, यासाठी प्रभारी महासचिव अॅड. संजीव सदाफुले यांना विनंती पत्र देणार असून, जर भूमिका बदली नाही तर मी पक्षाचा व प्रसंगी नगरसेवक पदाचा राजीनामा देईन, अशी आक्रमक भूमिका आनंद चंदनशिवे यांनी जाहीर केली आहे. दरम्यान, राहुल सरवदे यांनी बसपातर्फे सोलापूर लोकसभेसाठी मंगळवारी दुपारी अर्ज भरला. या पार्श्वभूमीवर चंदनशिवे यांनी आपला पवित्रा स्पष्ट केला आहे.
स्वतंत्र भारतातील पहिल्याच १९५२ च्या निवडणुकीत भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून निवडणुकीला उभे होते. तेंव्हा बाबासाहेब आंबेडकर हे संसदेत जाऊ नयेत यासाठी काँग्रेस पक्षाने आपला उमेदवार उभा करून त्यांचा पराभव केला होता. हा पराभव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जिव्हारी लागला होता. त्यामुळे पक्षश्रेष्ठींनी याचा विचार करावा, अन्यथा आंबेडकर या नावाच्या विरोधात जाणे आपणांस तरी शक्य नाही. पक्षाने दबाव वाढविल्यास आपण आपल्या सहकारी चार नगरसेवकांसह पक्षाचा राजीनामा देऊ असा इशाराही चंदनशिवे यांनी स्वतःच्या पक्षाला दिला आहे.