मुंबई - 15 व्या लोकसभा निवडणुकीच्या निकालात महायुतीने दमदार कामगिरी केली असून, महाविकास आघाडीला चारी मुंड्या चीत केलंय. या निकालावर बोलताना भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्र डागलंय. उद्धव ठाकरे यांची अवस्था सध्या शोले चित्रपटातील असराणी यांच्यासारखी झाली असल्याचे त्यांनी म्हटलंय. त्याचबरोबर उद्धव ठाकरे यांचे निवडून आलेल्या 20 आमदारांपैकी केवळ 2 आमदार त्यांच्यासोबत राहतील आणि इतर सर्व निघून जातील, असेही ते म्हणालेत. मुंबईत ते बोलत होते.
बाकी मेरे पीछे आओ : याप्रसंगी बोलताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, उद्धव ठाकरे यांचे 20 आमदार निवडून आले असले तरी आगामी काळात हे 20 आमदारदेखील त्यांना मानायला तयार होणार नाहीत. येणाऱ्या काळात या 20 आमदारांपैकी केवळ 2 आमदार उद्धव ठाकरे यांच्या सोबत राहतील, बाकी सर्व निघून जातील, असेही चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलंय. शोले चित्रपटामध्ये असराणी हे जेलर होते. तेव्हा ते कायम, 'आधे इधर जावो, आधे उधर जाओ और बाकी मेरे पीछे आओ' असे म्हणत होते. परंतु त्यांच्या मागे यायला कोणीच उरलेलं नसायचं. तीच अवस्था उद्धव ठाकरेंची झाली असल्याचा टोला चंद्रशेखर बावनकुळे यांनी लगावलाय.
पटोले यांनी मूल्यांकन करायला हवं : निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्र्यांची स्वप्न पाहणाऱ्या काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनाही बावनकुळे यांनी टोला लगावलाय. निवडणुकीच्या प्रचारादरम्यान अनेक ठिकाणी मीच मुख्यमंत्री होणार असल्याचा उल्लेख नाना पटोले यांनी केला होता. नाना पटोले यांनी त्यांच्या मतदारसंघांमध्ये निवडणुकीदरम्यान बराच वेळ घालवला. खेडेगावात त्याचप्रमाणे विधानसभा क्षेत्रावर दावे करूनसुद्धा आणि मतं मिळविण्यासाठी धमक्या देऊनही ते आता त्यांच्या मतदारसंघांमध्ये इतका कमी वेळ का घालवत आहेत? असा प्रश्नही चंद्रशेखर बावनकुळे यांनी उपस्थित केलाय. याबाबत नाना पटोले यांनी मूल्यांकन करायला हवं, असंही चंद्रशेखर बावनकुळे म्हणालेत.
एकही महापौर कुठेही निवडून येणार नाही : विधानसभेच्या घवघवीत यशानंतर आता आगामी महापालिका, जिल्हा पंचायत तसेच नगरपालिका निवडणुकीसाठी पक्षाने जोरात तयारी सुरू केल्याचं बावनकुळे यांनी सांगितलंय. ज्यांनी राज्यातील जनतेची फसवणूक केली त्यांना जनतेने आता नाकारलंय. त्यांची संख्या आता कमी झालीय. त्यात महाविकास आघाडीचा एकही महापौर कुठेही निवडून येणार नाही, असंही ते म्हणालेत. भाजपा निवडणूक समितीच्या जिल्हाध्यक्षांची बैठक आज मुंबईत पार पडली. यामध्ये दीड कोटी प्राथमिक सदस्य जोडणार असल्याचा निर्णय घेण्यात आलाय. दीड कोटी कुटुंब सदस्य म्हणून महाराष्ट्रातील दीड कोटी सदस्यांसहित प्रत्येक विधानसभा मतदारसंघांमध्ये 50 हजार नवीन सक्रिय सदस्यांची नोंदणी करणार असल्याचंही बावनकुळे यांनी सांगितलंय.
हेही वाचा