सांगोला (सोलापूर) - सांगोला तालुक्यातील फॅबटेक महाविद्यालयाजवळ ट्रक व मालवाहू जिपची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात रविवारी (दि. 4 जुलै) पंढरपूर-सांगोला रस्त्यावरील महाविद्यालयाजवळ घडला आहे. याप्रकरणी सांगोला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, मालवाहू जिप सांगोल्याहून पंढरपूरकडे निघाली होती तर पंढरपूरहून सांगोल्याच्या दिशेने ट्रक भरधाव येत होता. फॅबटेक महाविद्यालयाजवळ दोन्ही वाहनाची समोरासमोर धडक झाली. यात जिप चालकाचा व रस्त्यावरुन चाणाऱ्या एका व्यक्तीचा मृत्यू झाला. लक्ष्मण पवार (रा. लोकरेवाडी, ता. तासगाव, जि. सांगली) व चंद्रकांत ढेकळे (रा. पंढरपूर), अशी मृतांची नावे आहेत. ट्रक चालक मारुती केंद्रे (रा. नांदेड) हे गंभीर जखमी असून त्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेून रस्त्याच्या दोन्ही बाजुची वाहतूक सुरळीत केली. सांगोला पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद झाली आहे.
हेही वाचा - बंदी झुगारून सोलापुरात मराठ्यांचा आरक्षणासाठी आक्रोश.. पुन्हा एकदा एक मराठा ! लाख मराठा !