माळशिरस (सोलापूर) : माळशिरस तालुक्यातील तंरगफळ गावात आज (गुरुवार) सकाळी गॅस गळतीनंतर सिलेंडरचा स्फोट होऊन लागलेल्या आगीमध्ये आई आणि दोन मुलांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. आई सोनल ज्ञानेश्वर शिंदे (३०) आणि सावळा (७) कृष्णा (५) अशी मृत्यू पावलेल्या आई व मुलांची नावे आहेत.
प्राप्त माहितीनुसार, आई सोनल शिंदे या घरात स्वयंपाक करत होत्या. काही कामानिमित्त घराबाहेर गेल्या होत्या. त्याचवेळी गॅस गळती होऊन आगाचा भडका उडाला. घरामध्ये सावळा आणि कृष्णा ही दोन्ही मुले झोपली होती. घराबाहेर असणाऱ्या सोनल यांनी मुलांना वचावण्यासाठी घरात धाव गेली. मात्र, त्यानंतर आगीचा भडका अधिकच उडाला, त्यात सोनल देखील सापडल्या. त्यानंतर त्यांना घरातून बाहेर जाताच आले नाही. पहिले गॅस गळतीमुळे आग लागली, त्यानंतर गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्याने ही बातमी गावात पसरली.
हेही वाचा - बिहारमध्ये पुन्हा वज्रघात; एकूण २६ लोकांचा मृत्यू..
ग्रामस्थांच्या मदतीने घरातून दोन लहान मुले आणि आईला बाहेर काढण्यात आले. तिघेही गंभीर भाजले असल्यामुळे त्यांना तातडीने अकलूज येथील शासकीय दवाखान्यात दाखल करण्यात आले. अकलूज येथे सावळा शिंदे याचा मृत्यू झाला. आई सोनल आणि मुलगा कृष्णा हे जास्त प्रमाणात भाजल्याने सोलापूर येथे सामान्य रुग्णालयात पाठवण्यात आले.
कृष्णा शिंदे याचा सोलापुरला जात असतानाच मृत्यू झाला. तर आई सोनल हीचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. या घटनेमुळे तरंगफळ गावावर शोककळा पसरली आहे.