सोलापूर : सोलापुरातील श्री सिद्धेश्वर मंदिरात तिसऱ्या श्रावण सोमवारची पारंपारिक पूजा पार पडली. मंदिर सर्वसामान्यांसाठी जरी बंद असले तरी पूजा अर्चा सुरू आहेत. दरवर्षी श्रावण सोमवारी मंदिरात हजारो भाविकांची गर्दी असायची. मात्र, यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंदिर बंद ठेवण्यात आली असल्यामुळे भाविकांना मंदिरात प्रवेश नाही.
भारतीय संस्कृतीत श्रावण महिन्याला धार्मिकदृष्ट्या अतिशय महत्वाचे स्थान आहे. या महिन्यात धार्मिक विधी व व्रतवैकल्ये केल्यास लाभ होतो, अशी धारणा आहे. आज या महिन्यातील तिसरा सोमवार आहे. त्या निमित्ताने सोलापुरच्या श्री सिद्धेश्वर मंदिरात आरती पार पडली. सिद्धरामेश्वराच्या योग समाधीला अभिषेक घालून श्रावण महिन्यातील पारंपारिक पूजाअर्चा करण्यात आली. मंदिरातील पूजाऱ्यांच्या हस्ते पारंपारिक पूजा अर्चा करून श्रावण सोमवाराची आरती संपन्न झाली.
दरम्यान, दरवर्षी श्रावण सोमवारी होणाऱ्या कार्यक्रमात भाविकांची गर्दी असायची. मात्र, यंदा कोरोनाचा प्रादुर्भाव अद्याप सुरू असल्याने यावर्षी मंदिरे बंद ठेवण्यात आली. त्यामुळे, आजच्या श्रावण सोमवारच्या पुजेतही भाविकांना मंदिरात प्रवेश नव्हता. तर, कोरोनाला आळा घालण्यासाठी घरातच राहून श्रावण मासातला उपवास पाळावा, घरीच पूजाअर्चा करावी असे आवाहनही भाविकांना करण्यात आले आहे.