पंढरपूर - सोलापूर जिल्ह्यातील कोरोना संक्रमण वाढले आहे. ते रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने 30 एप्रिलपर्यंत बंद ठेवण्यात आली आहेत. मात्र पंढरपूर येथील व्यापाऱ्यांनी या बंदला विरोध केला आहे. सात तारखेपासून दुकाने खुले करावीत अशी व्यापाऱ्यांची मागणी केली आहे. पंढरपूर येथील व्यापारी आक्रमक झाले आहेत.
कोरोना बाबत नियम कडक करा.. मात्र टाळेबंदी नको -
पंढरपूर शहरातील व्यापाऱ्यांनी टाळेबंदी करण्यापेक्षा कोरोनाचे नियम कडक करावेत. व्यापाऱ्यांसाठी वेळेची मर्यादा ठरवून द्यावी, त्यांना दुकान उघडण्यासाठी एक नियमावली तयार करून घ्यावी, या नियमाप्रमाणे व्यापारी दुकान उघडते. मात्र पूर्णतः टाळेबंदी करून व्यापाऱ्यांची हाल करू नये, अशी मागणी पंढरपूर व्यापाऱ्यांकडून करण्यात येत आहे. पंढरपुरातील विठ्ठल मंदिरही मोजक्या भाविकांसह चालू ठेवावे. त्यावर पंढरपूर व्यापाऱ्यांचा आर्थिक गाडा चालत असे, अशी भावना व्यापाऱ्यांनी व्यक्त केली.
व्यापाऱ्यांच्या भेटीला उमेदवार -
पंढरपूर येथील व्यापाऱ्यांनी बंदला विरोध करत दुकाने खुली करण्याची मागणी केली आहे. सध्या पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणुकीचे वातावरण तापू लागले आहे. व्यापाऱ्यांचा विरोध सुरू झाल्यानंतर भाजप उमेदवार समाधान आवताडे, आमदार प्रशांत परिचारक यांनी व्यापाऱ्यांची भेट घेतली. त्यानंतर आमदार प्रशांत परिचारक यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणीस यांना फोन करून व्यापाऱ्यांच्या व्यथा सांगण्यात आल्या. त्यावेळेस व्यापाऱ्यांना त्यांचे म्हणणे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पोहोचवण्याचे आश्वासन फडणवीस यांनी दिले. त्यानंतर राष्ट्रवादीचे उमेदवार भगीरथ भालके यांनी व्यापाऱ्यांची भेट घेऊन त्यांच्या मागण्या ऐकून घेतल्या. त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांना फोन करत व्यापाऱ्यांच्या मागण्या सांगितल्या व त्यावर लवकर तोडगा काढण्याचे आश्वासन पवार यांनी दिले.