पंढरपूर - देशासह राज्यात कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. राज्यातील कोरोनाबाधितांची संख्याही दिवसेंदिवस वाढत आहे. या सर्व पार्श्वभूमीवर राज्य सरकारने पंढरीची पायी आषाढी यात्रा रद्द करण्याचा निर्णय घेतला. मात्र, या निर्णयामुळे पंढरपुरातील सर्व आर्थिक व्यवहार कोलमडले असल्याचे चित्र आहे.
राज्यात सर्व सार्वजनिक धार्मिक उत्सवांना मनाई करण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर यंदाची आषाढी पायी यात्राही रद्द करण्यात आली. पंढरीच्या विठोबाचे मंदिरही बंद आहे. तसेच भाविक, वारकऱ्यांना पंढरपुरात यायला मनाई करण्यात आली आहे. या सर्व बाबींमुळे पंढरपुरातील आर्थिक चक्र थांबले आहे. विठ्ठल मंदिर परिसरातील व्यापारीवर्गाची कोट्यावधींची उलढाल ठप्प झाली आहे. म्हणून या व्यापाऱ्यांनी राज्य शासनाकडे अर्थिक पॅकेजची मागणी केली आहे.
दरवर्षी आषाढी यात्रेच्या एक महिना आधीपासूनच पंढरपुरकरांना यात्रेचे वेध लागलेले असते. आषाढी एकादशीच्या आठ-दहा दिवस आधीपासून वारकर्यांची पंढरपुरात दाखल होत असतात. पंढरपुरात तुळशीच्या माळा बनवण्याचा व्यवसाय, काशीकापडी समाजातील महिला आणि पुरुष वर्षानुवर्षे करत आहे. शहरातील काही मोठे व्यापारी आपल्या कारखान्यात बत्ताशे, साखरफुटाणे साखरेच्या कांड्या बनवण्याचे काम करतात. या सर्व कामांना जवळपास एक महिन्याआधी सुरुवात होते. कामांसाठी कारखान्यांतून जास्त कामगार लावलेले असतात. मात्र, यंदा कारखाने बंद ठेवण्याची वेळ आली आहे.
हेही वाचा - वाळूज एमआयडीसीत 8 दिवस संचारबंदी; औरंगाबादकरांनाही 'लॉकडाऊन'चा इशारा
यासोबतच लाखेच्या बांगड्या, दगडी मूर्ती, फोटोफ्रेम बनवणाऱ्या कारगिरांचे अहोरात्र काम सुरू असते. आषाढी यात्रेत या सर्व मालाची मोठी उलाढाल होत असते. भजन साहित्य मृदुंग, एकतारी, विना, तुळशीच्या माळा, पेढ्याचा प्रसाद, चुरमुरे, बत्तासे अशा विविध प्रकारच्या वस्तूंना यात्रेत मोठी मागणी असते. मात्र, यंदा वारी रद्द झाल्यामुळे मागील चार महिन्यांपासून आमची काम ठप्प झाली आहे. आता जगायचे कसे? असा प्रश्न येथील व्यावसायिकांना पडला आहे.
ऐन आषाढीत विठोबानगरीत शुकशुकाट -
वारकऱ्यांसाठी पर्वणी असलेली आषाढी एकादशी सोहळा एका दिवसावर आलेला आहे. मात्र, असे असतानाही कोरोनामुळे यात्रेच्या शेकडो वर्षांच्या इतिहासात यावेळी पंढरीत इतका शुकशुकाट पाहायला मिळत आहे.