सोलापूर - जिल्ह्यातील सर्वाधिक ऊंच शिखर म्हणून ओळखला जाणारा माळशिरस तालुक्यातील सुळकाईचा डोंगर सद्या लुसलुशीत गवताने आच्छादला आहे. यामुळे हा डोंगर आता निसर्गप्रेमींना आकर्षित करत आहे. माळशिरस तालुक्याच्या पश्चिमेला आणि सातारा जिल्ह्याच्या सीमेवरील पर्वतरांगेतील उंचीवर सुळकाईचे मंदिर वसले आहे. या टेकडीवर वसलेले मंदिर समुद्रसपाटीपासून सुमारे आठशे मीटरवर असून ते सोलापूर जिल्ह्यातील सर्वोच्च ठिकाण मानले जाते.
माळशिरसपासून अवघ्या दहा किलोमीटर अंतरावरील गोरडवाडी शिवारातील आणि माळशिरस म्हसवडच्या रस्त्यावर हे ठिकाण आहे. यंदा संपूर्ण पावसाळा कोरडा गेल्यामुळे हा परिसर भर पावसाळ्यात ओसाड वाटत होता. मात्र, मागील काही दिवसांपासून कोसळणाऱ्या दमदार पावसामुळे हा डोंगर आता हिरवागार झाला आहे. परतीच्या पावसामुळे सद्या हा परिसर बहरला असून माळशिरस म्हसवड रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे लक्ष्य वेधून घेत आहे.
गारवाड येथे जन्मलेले आणि ब्रिटिश काळात जळगाव जिल्ह्यातील अमळनेर शहराचे अकरा वर्षे नगराध्यक्षपद भूषविलेले कॅप्टन मल्हारी चिकटे यांनी या डोंगरावर छोटेसे मंदिर उभारले होते. यानंतर २००५ साली या मंदिराचा जीर्णोद्धार तत्कालीन ग्रामविकास मंत्री व माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. हे ठिकाण सुमारे पन्नास चौरस फूट जागेवर टोकदार सुळकी व पिरॅमिडच्या आकाराचे असल्यामुळे ते नजरेत भरते. या ठिकाणावरून चारही बाजूने अवलोकन केल्यास विहंगम दृश्य दिसते. डोंगराच्या पायथ्याला असलेल्या शेती, शेततळी आणि नैसर्गिक तलाव निसर्गावलोकन करणाऱ्यांना मोहात पाडतात. पावसाळ्यात पडलेल्या पावसामुळे हिरवाईने बहरलेला हा परिसर या हिवाळ्यात पडणाऱ्या धुक्यामुळे अतिशय विलक्षण वाटत आहे.
भटकंतीचे आवड असणाऱ्या निसर्गप्रेमींना हे ठिकाण एका दिवसाच्या निसर्ग भ्रमंतीला अतिशय मनोहारी आहे. या दिवसांत परिसरातील कीटक, सरपटणारे प्राणी यांचं भक्ष्यण करणारे शिकारी पक्षी या ठिकाणी गर्दी करतात. त्यामुळे पक्षी निरीक्षकांसाठी हे ठिकाण पर्वणी ठरत असल्याचे पक्षी तथा पर्यावरण अभ्यासक डाॅ.अरविंद कुंभार यांनी सांगीतले.
हेही वाचा - 'संजय राऊत म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणातील हिरा'