सोलापूर - सोलापूर शहर व ग्रामीण, उस्मानाबाद, आळंद आणि उमरगा परिसरात चोऱ्या करणाऱ्या दोन चोरट्यांना सोलापूर शहर गुन्हे शाखेने अटक केली. आरोपींना तुळजापूर तालुक्यातून अटक करण्यात आली. त्यांच्याकडून 9 दुचाकी वाहने आणि 1 कार, असा 6 लाख 45 हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अमोल महादेव धोत्रे (रा. अणदूर, ता. तुळजापूर, जि. उस्मानाबाद), शरीफ मौला शेख (रा. इटकळ, ता. तुळजापूर, जि. उस्मानाबाद) अशी अटक झालेल्या आरोपींची नावे आहेत.
हेही वाचा - पंढरपूर तालुक्यात तीन अल्पवयीन मुलींवर अत्याचार, एकावर पोक्सो कलमांतर्गत कारवाई
अमोल धोत्रे व शरीफ शेख हे दोघे दुचाकी चोरून कमी किमतीत विकत असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती. त्यानुसार गुन्हे शाखेचे पोलीस त्यांच्या मागावर होते. सदर दोघेही चोरटे दुचाकी वाहन विक्रीसाठी सोलापूर शहरात येणार असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. शहर गुन्हे शाखेने हैदराबाद रोडवरील मंत्री चांडक पार्क येथे सापळा लावला. अमोल व शरीफ येताच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आणि चौकशी सुरू केली.
विविध गुन्हे उघडकीस
अमोल धोत्रे आणि शरीफ शेख यांनी उमरगा, उस्मानाबाद, सोलापूर शहर व ग्रामीण, आळंद (जि. गुलबर्गा, रा. कर्नाटक) येथून दुचाकी चोरल्या होत्या. या चोरीत त्यांनी एका स्विफ्ट कारचा उपयोग केला होता. या दोन्ही चोरांनी आणखीन एका साथीदाराला घेऊन चोऱ्या केल्या असल्याची कबुली दिली. तिसऱ्या चोरट्याचा शोध सुरू आहे.
ही कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक अजित कुंभार, पोलीस नाईक संतोष फुटाणे, राकेश पाटील, शितल शिवशरण, विजयकुमार वाळके, संदीप जावळे, वसंत माने, सचिन बाबर आदींनी केली.
हेही वाचा - माघी वारी निमित्ताने विठुरायाची मंदिर दोन दिवस राहणार बंद