सोलापूर- शहरात प्लास्टिक बंदी असतानादेखील बेकायदा प्लास्टिक विक्री करणाऱ्या दुकांनांवर महापालिकेच्यावतीने दंडात्मक कारवाई करण्यात आली. सहायक आयुक्त विक्रमसिंह पाटील व मुख्य सफाई अधीक्षक यांच्या नियंत्रणाखाली ही कारवाई करण्यात आली. यावेळी १८० किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले असून जवळपास 1 लाख 6 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
शहरातील या दुकानांवर झाली कारवाई-
सोलापूर शहरातील अनेक नामवंत दुकानांवर पालिकेच्यावतीने दंडात्मक कारवाई करण्यात आली. यामध्ये अंबिका प्लास्टिक, महेश प्लास्टिक, अर्चना प्लास्टिक, भाईजी होटेल, आनंद स्वीट, माऊली हॉटेल, आप्पा हलवाई, रेणुका प्लास्टिक, अभिषेक, सिद्धेश्वर प्लास्टिक, सुशील सेल्स, कोहिनूर आदी दुकानांवर कारवाई करण्यात आली.
तिसऱ्यांदा दुकानांत प्लास्टिक आढळल्यास गुन्हे दाखल होणार-
महाराष्ट्र शासनाच्या अ विघटन कचरा केंद्र 2006 आणि सुधारित 11 एप्रिल 2018 अधिसूचनेनुसार प्लास्टिक वापरावर बंदी घालण्यात आली आहे. पहिल्यांदा प्लास्टिक वापरताना व्यक्ती किंवा दुकानदार आढळल्यास पाच हजार रुपये दंड आकारण्यात येईल. तसेच दुसऱ्यांदा ती व्यक्ती किंवा दुकानदार प्लास्टिक वापरताना आढळल्यास दहा हजार रुपये दंड आकारण्यात येईल आणि तिसऱ्यांदा प्लास्टिक वापरताना दुकानदार अथवा व्यक्ती आढळल्यास 25 हजार रुपयांचा दंड आणि त्यांच्यावर गुन्हा देखील दाखल करण्यात येऊ शकतो.
सोलापूरकरांनी कापडी पिशवीचा वापर करावा-
यापुढे जर कोणताही दुकानदार प्लास्टिक पिशवीचा वापर करताना आढळल्यास दंडात्मक कारवाईसोबत त्याच्यावर गुन्हादेखील दाखल करण्यात येणार असल्याचे उपायुक्त धनराज पांडे यांनी सांगितले. तसेच नागरिकांनी आणि दुकानदरांनी प्लास्टिक पिशवीचा वापर न करता कापडी पिशवीचा वापर करून पर्यावरणाचे रक्षण करावे, असे आवाहनही पांडे यांनी केले आहे.