सोलापूर- सोलापूर शहरात मंगळवारी कोरोनाचे 38 रुग्ण आढळले आहेत. 39 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.5 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. ग्रामीण भागात 30 रुग्ण नव्याने आढळले आहेत. एका रुग्णाचा मृत्यू झाल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली आहे.
सोलापूर शहरात वाढती रुग्ण संख्या व वाढता मृत्यू दर, यामुळे शासनाची व नागरिकांची चिंता वाढू लागली आहे.या पार्श्वभूमीवर साखळी तोडण्यासाठी कडक संचारबंदीची मागणी जोर धरू लागली आहे. याला काही समाजसेवकांनी व काही राजकीय पक्षांनी जोरदार विरोध केला आहे.
सोलापूर महानगरपालिका क्षेत्रात मंगळवारी 271 कोरोना तपासणी अहवाल प्राप्त झाले. त्यामधून 233 अहवाल निगेटिव्ह आले तर 38 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामध्ये 23 पुरुष व 15 महिलांचा समावेश आहे. 39 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. मंगळवार पर्यंत सोलापूर शहरात 2 हजार 852 बाधित रुग्ण आढळले आहेत. तर मृतांची संख्या 282 झाली आहे.
सोलापूर ग्रामीण मध्ये मंगळवारी 30 कोरोनाबाधित वाढले आहेत. यामुळे ग्रामीणमधील कोरोनाबाधितांची संख्या 587 इतकी झाली आहे .यात 375 पुरुष आणि 212 महिलांचा समावेश आहे. मृतांची संख्या 1 ने वाढून 27 इतकी झाली आहे. ग्रामीण विभागात 319 पॉझिटिव्ह रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. तर आतापर्यंत 241 जण कोरोनामुक्त झाले आहेत.
तालुकानिहाय कोरोना रुग्णांची संख्या पुढीलप्रमाणे
दक्षिण सोलापूर 210, अक्कलकोट 116,बार्शी 110,उत्तर सोलापूर 61, करमाळा 6,माढा 12, माळशिरस 6,मंगळवेढा 1 ,मोहोळ 29,पंढरपूर 32 ,सांगोला 4.
दक्षिण सोलापूर तालुका होतोय हॉटस्पॉट
सोलापूर जिल्ह्यातील 11 तालुक्यामधून दक्षिण सोलापूर कोरोना विषाणू महामारीचा हॉटस्पॉट होत आहे. 210 रुग्ण फक्त दक्षिण सोलापूर तालुक्यामध्ये आढळले आहेत. त्या पाठोपाठ अक्कलकोटचा क्रमांक लागतो. सध्या कोरोनाची साखळी तोडण्यासाठी अक्कलकोट मध्ये 8 दिवसांची कडक संचारबंदी 13 जुलैपर्यंत लागू करण्यात आली आहे.