पंढरपूर - वारकऱ्यांचे आराध्य दैवत असणाऱ्या पांडुरंगाचे मंदिर हे प्राचीन मंदिर म्हणून ओळखले जाते. विठ्ठल-रुक्मिणी मंदिराचे प्राचीन स्वरूप जपण्यासाठी व सुशोभिकरणासाठी लवकरच संरचनात्मक लेखापरिक्षण करण्यात येणार आहे. त्याला पुरातत्व विभागाकडून मान्यता मिळाली आहे. तसेच, विठ्ठल मंदिराचा डीपीआर पंधरा दिवसांत तयार करण्यात येणार असल्याची माहिती मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली आहे.
'विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या प्रत्येक शिलाचे निरीक्षण होणार'
महाराष्ट्र राज्यातील वैभवशाली वास्तूंपैकी पंढरपूर येथील विठ्ठल-रुक्मिणी मंदिर आहे. विठ्ठल रुक्मिणी मंदिर हे बाराव्या शतकातले असल्याची नोंद आहे. त्यामुळे विठ्ठल-रुक्मिणी मंदिराचे शिल्प हे चिरंतन कालापर्यंत टिकण्यासाठी मंदिर समितीकडून डीपीआर बनवण्याचे काम पुरातत्व विभागाकडे मंदिर समितीने दिले आहे. यामध्ये विठ्ठल मंदिरातील प्रत्येक शीलाचे ऑडिट केले जाणार आहे. यामध्ये नामदेव पायरीपासून ते विठ्ठलाच्या गाभाऱ्यापर्यंत पुरातत्व विभागाचे अधिकारी निरीक्षण करणार आहेत. त्यानंतर पंधरा दिवसांत पुरातत्व विभागाकडून डीपीआर तयार केला जाणार आहे. तसेच, मंदिराचे सर्व संरचनात्मक लेखापरिक्षण होणार आहे.
'संत नामदेव पायरीचे सुशोभीकरण होणार'
विठ्ठल-रुक्मिणी मंदिरातील शिलालेखामध्ये कोणतेही बदल करताना पुरातत्व विभागाची मंजुरी घेणे आवश्यक असते. विठ्ठल-रुक्मिणी मंदिराची निर्मिती झाल्यापासून आजपर्यंत मंदिराचे स्ट्रक्चरल ऑडिट झाले नाही. त्यामुळे ऑडिट मंदिराच्या निर्मितीपासून पहिल्यांदाच होणार आहे. हे काम पंधरा दिवसांत पूर्ण करून त्यासंदर्भातील डीपीआर बनवल्यानंतर राज्य सरकारला पाठवणार आहेत. तसेच, विठ्ठल मंदिराची पहिली पायरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या संत नामदेव पायरीचेही सुशोभीकरण होणार आहे. मंदिर चिरंतन टिकावे. तसेच, मंदिराच्या पुरातत्व स्वरूपाला कोणताही धक्का न लावता हे डीपीआर बनवण्याचे काम पुरातन विभागाकडे देण्यात आले असल्याची माहिती मंदिर सहसमितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली आहे.