पंढरपूर - सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यातील माडग्याळ जातीचा सर्जा मेंढ्याचा 29 एप्रिल रोजी उपचार चालू असताना मृत्यू झाला. त्याला बाजारामध्ये 71 लाख रुपयांपर्यंत बोली लागली होती. सांगोला तालुक्यातील चांडोलीवाडी या गावातील मेंढपाळ बाबूराव मिटकरी यांचा सर्जा नावाचा मेंढा होता. बाबूराव मिटकरी यांनी त्याचे नाव सर्जा ठेवले होते. सर्जा मेंढ्याचे वैशिष्ट्य म्हणजे त्याचे नाक पोपटासारखे मोठे होते. त्यामुळे तो लक्षवेधी ठरत होता.
सर्जाची 71 लाखाला मागणी
महाराष्ट्र, कर्नाटक राज्यात आटपाडी कार्तिकी पौर्णिमेची यात्रा प्रसिद्ध आहे. या यात्रेमध्ये पशुपालक, मेंढपाळ मोठ्या संख्येने एकत्र जमत असतात. या मोठ्या उत्सवात हौशी मेंढपाळ, पशुपालक जनावरांसह हजर राहत असतात. याच बाजारामध्ये बाबूराव मिटकरी यांच्या सर्जालाही प्रसिद्धीसाठी दाखल केला होता. त्यावेळी त्याला 71 लाख रुपये इतकी बोली लागली होती.
सर्जाकडून वर्षाला मिळायचे 50 लाखांचे उत्पन्न
बाबूराव मेटकरी हे मेंढपाळाचे हौशी असल्यामुळे त्यांनी सर्जा विकला नाही. त्यांना त्याच्यापासून जातीवंत पिल्ली, मादी व नर पैदास करायची होती. त्यामुळे ते सर्जाला विकत नव्हते. सर्जाकडून वर्षाकाठी मिटकरी कुटुंबाला 50 लाख रुपयांचे उत्पन्न मिळत होते.
न्यूमोनियामुळे सर्जाचा मृत्यू
सांगोला तालुक्यातील सर्जा हा राज्यात प्रसिद्ध होता. त्याला पाहण्यासाठी राज्यातून हौशी मेंढपाळ येत असत. मात्र, गेल्या काही दिवसांपासून त्याला न्यूमोनिया आजाराचा त्रास सुरू झाला होता. त्याला उपचारासाठी पंढरपूर तालुक्यातील कासेगाव येथे पशुवैद्यकीय दवाखान्यात दाखवण्यात आले होते. मात्र 29 एप्रिल रोजी सकाळी साडेअकरा वाजता सर्जाचा मृत्यू झाला. यामुळे मिटकरी कुटुंबावर संकट कोसळले आहे.
हेही वाचा - पोटात लपविलेले 2 किलो कोकेन जप्त, 2 विदेशी तस्करांवर कारवाई
हेही वाचा - 'आयपीएस' अधिकारी परमबीर सिंह यांनी मुंबई उच्च न्यायालयात नव्याने दाखल केली याचिका