सोलापूर - महानगरपालिकेतील 107 नगरसेवकांना कोरोना आपातकालीन परिस्थितीत काम करताना शासनस्तरावरील 50 लाखांचा विमा उतरविण्यात यावा, अशी मागणी सोलापुरातील नगरसेवक करत आहेत. अशा आशयाचे निवेदन नगरसेविका अनुराधा काटकर यांनी सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे, सोलापूरचे जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्त यांना दिले आहे.
शुक्रवारी (दि. 19 जून) महानगरपलिकेत होणाऱ्या सर्वसाधारण सभेत याबाबत प्रस्ताव देण्यात येणार होता. परंतु कोरोना आपातकालीन परिस्थिती तसेच सामाजिक अंतराच्या कारणामुळे ही सभा होणार नाही, असे परिपत्रक काढून सभा रद्द करण्यात आली. या पार्श्वभूमीवर हा विषय अत्यंत गंभीर असून दैनंदिन प्रत्येक नगरसेवकांना आपल्या प्रभागात काम करत असताना प्रतिबंधित क्षेत्रात, सॅनिटायझेशन, भाग सील करताना, रुग्ण मिळत नसताना त्यांची माहीती देणे, सर्व्हे टीमला मदत करताना, रुग्णांच्या संपर्कातील लोकांना क्वॉरंटाइन करणे अशा सर्वच ठिकाणी नगरसेवकांना स्वत: बाधित जागेवर जावे लागते. अशी परिस्थिती असल्याने सर्व नगरसेवकांचा 50 लाखांचा विमा उतरविण्यात यावा यासाठी नगरसेवक आग्रही आहेत.
शासनस्तरावर मान्यता देऊन नगरसेकांना विमा योजनेत समाविष्ट करुन घ्यावे, या मागणीवर निर्णय न झाल्यास आमदार प्रणिती शिंदे यांच्यामार्फत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना निवेदन देणार असल्याचे नगरसेविका काटकर यांनी सांगितले आहे.
हेही वाचा - 'केंद्र सरकारच्या 3 लाख कोटी रुपयांच्या घोषणेचा सोलापूरच्या लघु उद्योजकांना फायदा नाही'