सोलापूर (पंढरपूर) - महाविकास आघाडी सरकार बरखास्त करण्याची मागणी भाजप सातत्याने करत आहे. त्यांची ही मागणी हास्यास्पद आहे, असा टोला राज्याचे जलसंपदामंत्री तथा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाजपला लगावला आहे. अँटिलिया प्रकरण, मनसुख हिरेन आणि सचिन वाझे या प्रकरणांमधे जे दोषी असतील, त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असेही जयंत पाटील म्हणाले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह जयंत पाटील हे कार्यकर्त्यांच्या मेळाव्यासाठी पंढरपूर येथे आले होते. तेव्हा पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला. मात्र, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माध्यमांशी बोलण्यास नकार दिला.
मुंबई येथील अंबानींच्या घराच्या बाहेर ठेवलेली स्फोटकांची गाडी, मनसुख हिरेनचा संशयास्पद मृत्यू हे प्रमुख प्रश्न राज्यातील प्रसार माध्यमे मांडत आहेत. यापासून लक्ष विचलित करण्यासाठी मुंबईचे माजी आयुक्त परमबीर सिंग यांच्या कथित पत्रासारख्या बातम्या पेरल्या जात आहेत का? याबाबत महाविकास आघाडी सरकारकडून नक्कीच शाहनिशा केली जाईल, असे प्रतिपादन जयंत पाटील यांनी केले. गृहमंत्री अनिल देशमुख चांगले काम करत आहेत. त्यांच्या राजीनाम्याचा प्रश्नच येत नाही, असे वक्तव्यही पाटील यांनी केले.
शरद पवारांनी बोलावली बैठक -
माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या कथित पत्रानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिल्लीत बैठक बोलावली आहे. शरद पवारांनी अजित पवार आणि जयंत पाटील यांना तातडीने दिल्लीला बोलावून घेतले आहे. गृहमंत्री अनिल देखमुख यांच्यावर लावलेल्या गंभीर आरोपांच्या पार्श्वभूमीवर ही बैठक महत्त्वाची मानली जात आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची शक्यता नाकारता येत नाही.
काय आहे मूळ प्रकरण?
उद्योजक मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर २५ फेब्रुवारीला स्पोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ आढळून आली होती. यानंतर मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने या प्रकरणाचा तपास सुरू केला. या प्रकरणी स्कॉर्पिओचे मालक मनसुख हिरेन यांचा मृतदेह 5 मार्च रोजी रेतीबंदरमधील खाडीत आढळून आला. यानंतर विरोधकांनी हे प्रकरण उचलून धरत गुन्हे शाखेचे अधिकारी सचिन वाझेंवर कारवाईची मागणी केली. दरम्यान, हिरेन यांच्या पत्नीनेही वाझेंवर आरोप केले. यानंतर अँटिलिया प्रकरणाचा तपास एनआयएकडे सोपविण्यात आला. तर हिरेन प्रकरणाचा तपास एटीएसकडून केला जात होता. मात्र हा तपासही एनआयएकडे देण्यात आला आहे.
हेही वाचा - शरद पवारांनी दिल्लीत बोलावली राष्ट्रवादी नेत्यांची बैठक