सोलापूर - कोरोनाची साथ सुरू झाल्यापासून सिव्हिल हॉस्पिटलमध्ये 107 माता कोरोनाग्रस्त होत्या. यातील शंभरावी माता शनिवारी (दि. 5 सप्टें) कोरोनामुक्त झाली. या शंभराव्या मातेची पाठवणी प्रभारी अधिष्ठाता डॉ. शुभलक्ष्मी जयस्वाल यांनी फुलांचा वर्षाव करुन, साडीचोळीचा आहेर देत त्या मातेला डिस्चार्ज दिला.
सोलापुरात 12 एप्रिल, 2020 रोजी कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला होता. सोलापूर येथे कोरोनाची साथ सुरु झाल्यापासून आजतागायत 2 हजार 503 मातांनी बालकांना जन्म दिला. त्यापैकी 107 माता या कोरोनाग्रस्त होत्या. त्यातील 100 कोरोनाबाधित माता आजपर्यंत कोरोनामुक्त होऊन सुखरुपपणे घरी गेल्या आहेत. यापैकी 8 मातांची नवजात बालके कोरोनाबाधित होती, ती सुध्दा कोरोनामुक्त होऊन घरी गेली आहेत. या शंभरपैकी 61 मातांना सिझेरियन करावे लागले तर 39 मांताची प्रसूती नॉर्मल झाली आहे.
याप्रसंगी प्रभारी अधिष्ठाता डॉ. जयस्वाल म्हणाल्या, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी या रुग्णालयात वेळोवेळी लावणाऱ्या साधनसामुग्री आणि औषधासाठी निधी दिला. रुग्णालयात येणाऱ्या अडचणी दूर केल्या. त्यामुळे काम करणे सुखकर झाले. अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकुर यांनी वेळोवेळी योग्य ते मार्गदर्शन केले. तसेच त्यांनी शासकीय रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षक डॉ. औदुंबर मस्के, प्राध्यापक, विभाग प्रमुख, स्त्रिरोग विभागाच्या डॉ. विद्या तिरणकर, स्त्रिरोग विभागातील डॉक्टर, परिचारिका, चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांचे विशेष अभिनंदन केले. तसेच यापुढेही रुग्णालयात गोरगरीब व गरजू रुग्णांना अशाच प्रकारे अविरत सेवा देत राहू, अशी ग्वाही अधिष्ठाता डॉ. जयस्वाल यांनी दिली.
हेही वाचा - सोलापुरात ऑक्सिजनचा पुरेसा साठा - पालकमंत्री भरणे