माढा (सोलापुर) - पोलिसांनी माढा तालुक्यातील उपळवाटे गावात राहत्या घरातच गुटखा बनवणाऱ्या पिता पुत्राना रंगेहाथ ताब्यात घेऊन त्यांच्याकडून गुटख्यासह गुटखा तयार करण्यासाठी लागणारे साहित्य असा एकूण ८ लाख १३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
टेंभुर्णी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दयानंद गावडे व सहायक पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम या दोन अधिकाऱ्याच्या पथकाने ही कारवाई केली आहे. पोपट काशिनाथ भोसले व शंकर पोपट भोसले असे त्या विनापरवाना गुटखा तयार करताना सापडलेल्या बाप लेकाचे नाव असून त्यांना अटक करण्यात आली आहे. ही कारवाई पोलिसांनी शनिवारी केली.
सध्या लाॅकडाऊन सुरु असल्याने गुटखा व दारु विक्री बंद असल्याने अनेकांना व्यसनाला मुरड घालावी लागलीय. काही महाभाग मात्र वाढीव दर देऊन सुध्दा गुटखा खाणे पसंत करत आहेत. अशा परिस्थितीत घरातच गुटखा बनवणाऱ्या पिता पुत्राचा कारनामा पोलिसांनी समोर आणलाय.
भोसले पिता पुत्र उपळवाटे येथील आपल्या घरातच नबाब ब्रॅडचा गुटखा अनेक दिवसांपासून तयार करीत होते. त्यांच्या मुसक्या आवळण्यात टेभुर्णी पोलिसांना यश आले आहे.
४ लाख ९२ हजार किंमतीचा गुटखा तसेच ३ लाख १३ हजार रुपयांचे गुटखा बनवण्यासाठी लागणारे साहित्य असा ८ लाख १३ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. पोलिसांनी या प्रकरणी सुरु केलेल्या प्राथमिक चौकशीतून चंद्रकात ज्योतिराम क्षीरसागर(रा.निंमगाव (टे) ता.माढा) यांचाही या गुटखा रॅकेट मध्ये सहभाग असल्याचे तपासातून समोर आले आहे. या प्रकरणाचा अधिक तपास स.पो.नि राजेंद्र मगदूम करत आहेत.