सोलापूर : जिल्ह्यातील कुर्डूवाडी बायपास रोड पुलाखाली गांजा विक्रीसाठी घेऊन जात असलेल्या ४ व्यक्तींना पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून गांजासह सहा लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. या प्रकरणी प्रशांत बिभीषण उकरंडे वय (२३ वर्ष), अविनाश चंद्रकांत हरकरे वय (३० वर्ष), समाधान दिलीप हलकरे वय ( ३० वर्ष) व जासम मोहम्मद जीमल शेख वय (२२ वर्ष) सर्व राहणार तेरखेडा, जिल्हा उस्मानाबाद यांना रंगेहात अटक करण्यात आली आहे.
टेंभुर्णी येथे स्विफ्ट कार (नंबर एमएच ०६ सीबी ३५७३) मध्ये विक्रीसाठी घेऊन चाललेला सुमारे ९ किलो ९५० ग्रॅम वजनाचा गांजा टेंभुर्णी पोलिसांनी मोठ्या शिताफीने २७ ऑगस्टला दुपारी २ च्या दरम्यान पकडला. सविस्तर माहितीनुसार, टेंभुर्णी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिमान गुटाळ हे कर्तव्यावर होते. यावेळी, कुर्डूवाडी रोडवरती टेंभुर्णी बायपास पुलाखाली एका कारमध्ये काही व्यक्ती गांजा विक्री करण्याच्या उद्देशाने घेऊन जात असल्याची गुप्त माहिती खबऱ्यामार्फत मिळाली.
या माहितीच्या आधारे टेंभुर्णी पोलिसांनी सापळा रचून सदर कार ताब्यात घेत कारवाई यशस्वीरित्या पार पाडली. या कारवाईत पोलिसांनी अवैध गांजासह १५ हजार रुपये किमतीचे तीन मोबाईल, रोख रक्कम २ हजार ६१० रुपये व मारुती स्विफ्ट कार असा एकूण ६ लाख १७ हजार ११० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. प्रशांत उकरंडे, अविनाश हरकरे, समाधान हलकरे व जासम मोहम्मद जीमल शेख यांना रंगेहात अटक करण्यात आली. त्यांच्यावर विविध कलमांनुसार टेंभुर्णी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास टेंभुर्णी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजकुमार केंद्रे हे करीत आहेत.
हेही वाचा - विठुरायाचे मुखदर्शन घेऊ.. मात्र, विठु माऊलीच्या पायावर अल्कोहोलयुक्त सॅनिटायझर नको