सोलापूर - माढा तालुक्यातील बेकरी व्यापाऱ्याचा खून झाल्याचे उघडकीस आले आहे. मृतदेह टेम्पोसह जाळून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात आला. संजय काळे असे मृत व्यापाऱ्याचे नाव आहे. अज्ञात मारेकऱ्यांविरोधात टेंभुर्णी पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.
शेवरे (ता.माढा) येथील रहिवासी संजय काळे यांचा निर्घृणपणे खून करण्यात आला. अज्ञात मारेकऱ्यांनी तीक्ष्ण हत्याराने खून करून मृतदेह जाळून खुनाचा पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. खून झालेला बेकरी व्यापारी हा आठवडा बाजारात खारी, ठोस, बटर, ब्रेड हे साहित्य विकण्याचा व्यवसाय करत होते.
याबाबत अधिक माहिती अशी की, शिराळ येथील संजय मारुती काळे हे शनिवारी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास जेवण करून झोपण्यासाठी त्यांच्या खोलीत गेले. त्यानंतर सकाळी ते घरातून गायब असल्याचे कुटुंबियांच्या निदर्शनास आले. त्यांचा मोबाईल व टेम्पोही गायब होता. यामुळे त्यांची शोधाशोध सुरू होती. व्यापाऱ्याचा फोन लागत नसल्याने त्यांच्या पत्नीने टेंभुर्णी पोलीस ठाणे गाठून पती गायब असल्याची माहिती पोलिसांना दिली.
अकलूज-टेंभुर्णी रस्त्याच्या पूर्वेस उजनी कॅनॉलजवळ छातीच्या खालचा भाग जळालेल्या अवस्थेतील अनोळखी व्यक्तीचा मृतदेह दिसून आला. या ठिकाणी (एमएच-४५-६५७७) या क्रमांकाचा टेम्पो पलटी केलेला होता. मारेकऱ्यांनी टेम्पोची स्टेफनी अंगावर टाकून मृतदेह पेटवून दिला असावा, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.
पोलिसांनी घटनास्थळी जाऊन मृतदेह ताब्यात घेतला. हा मृतदेह शवविच्छेदनासाठी टेंभुर्णी प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठविण्यात आला. शिराळ ग्रामस्थांनी प्राथमिक आरोग्य केंद्रासमोर मोठी गर्दी केली होती. खुन कोणत्या कारणावरुन झाला हे अद्याप स्पष्ट झाले नाही. याप्रकरणी मृताचा मुलगा आकाश संजय काळे यांनी खुनाची तक्रार टेंभुर्णी पोलीस ठाण्यात दिली आहे. याप्रकरणी पोलीस निरीक्षक राजकुमार केंद्रे अधिक तपास करत आहेत.