सोलापूर - स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी एका संशयित चोरट्यास अटक करून 39 दुचाकी चोरी केल्याचे गुन्हे उघडकीस आणले आहे. सोलापूर शहर, जिल्हा, पुणे, अहमदनगर, सातारा, कोल्हापूर बीड या जिल्ह्यांमधून या चोरट्याने 21 लाख 45 हजार रुपयांच्या दुचाकी वाहने चोरी केली होती. नामदेव बबन चुनाडे (वय 48 रा, अनिल नगर, पंढरपूर, जि सोलापूर) असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. याबाबत पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती सांगितली.
नामदेव चुनाडे राज्यभर दुचाकी वाहने चोरी करत होता-
नामदेव चुनाडे याने महाराष्ट्र राज्यातील विविध जिल्ह्यात पार्किंग केलेली अनेक वाहने हातोहात लंपास केली होती. त्यामध्ये होंडा शायीन, बुलेट, स्प्लेन्डर, बजाज आदी कंपनीची दुचाकी वाहने चोरी करत होता. सोलापूर शहर आणि जिल्हा, पुणे, अहमदनगर, सातारा, बीड, कोल्हापूर या जिल्ह्यांमधून वाहने त्याने चोरी केली होती. तो ही चोरीची वाहने अतिशय कमी किंमतीत विक्री करत होता. अगदी लाख रुपयांचे दुचाकी वाहन 10 ते 20 हजार रुपयांना विक्री करत होता. अखेर या आंतरजिल्हा संशयित चोरट्याचे बिंग फुटले आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या तावडीत सापडला. पोलिसांनी सर्व दुचाकी वाहने हस्तगत केली असून आणखी तपास सुरू असल्याची माहिती दिली.
"पितळी मास्टर की"च्या सहाय्याने चोरली वाहने -
नामदेव चुनाडे याने सोलापूर सह इतर जिल्ह्यात वाहने चोरी करण्यासाठी पितळी 'मास्टर की' चा आधार घेतला होता. या पितळी मास्टर कीच्या साहायाने त्याने अनेक वाहने लंपास केली आहे. संशयित चोरट्याने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी 39 दुचाकी (21 लाख 45 हजार किंमत) वाहने जप्त केली आहेत. याची आणखी कसून चौकशी सुरू आहे. त्याकडे आणखीन दुचाकी मिळण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. या संशयित चोरट्याच्या अटकेची कारवाई पीएसआय अमित सिदपाटील, राजेश गायकवाड, दिलीप राऊत, श्रीकांत गायकवाड, विजयकुमार भरले, सलीम बागवान, हरिदास पांढरे, रवी माने, सचिन गायकवाड, केशव पवार यांनी केली.