करमाळा - बीसीसीआय अंतर्गत म्हैसूर येथे सुरू झालेल्या 23 वर्षांखालील क्रिकेट स्पर्धांसाठी महाराष्ट्र संघातून खेळण्यासाठी करमाळा तालुक्यातील कोळगाव येथील ट्रक चालकाचा मुलगा सुरज शिंदेची निवड करण्यात आली आहे. सुरजचे वडील कैलास शिंदे यांनी शेतीवर उपजीविका करणे अवघड झाल्याने दुसऱ्याच्या ट्रकवर काम करतात. त्यांच्या मुलाने दैदिप्यमान कामगिरी करत हे यश संपादन केले आहे.
![suraj shinde of karmala selected in maharashtra under 23 cricket team](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mh-sol-karamala-01-krida-surajshindemaharashtracricketteamnivad-mhc10005_08112019092901_0811f_1573185541_961.jpg)
हेही वाचा - जगज्जेत्या ओकुहाराने गमावले पहिले स्थान, यू फेईने जिंकले चीन ओपनचे जेतेपद
सुरजचे आजोबा इंद्रजीत शिंदे हे कोळगाव येथे शेती करत होते. वीस वर्षांपूर्वी शेतीत काहीच होण्यासारखे नसल्याने सुरजचे वडील कैलास शिंदे यांनी पुणे गाठले. सुरजची कारकिर्द घडवण्यात त्याच्या आजोबांचा मोठा वाटा आहे. श्रीमंताचा खेळ समजला जाणाऱ्या क्रिकेटसाठी सुरजच्या वडिलांनी होकार दिला आणि वेळोवेळी मदतही केली. दुसऱ्याच्या ट्रकवर काम करुन सुरजच्या स्वप्नांना त्यांनी अधिक बळकट केले.
![suraj shinde of karmala selected in maharashtra under 23 cricket team](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mh-sol-karamala-01-krida-surajshindemaharashtracricketteamnivad-mhc10005_08112019092901_0811f_1573185541_95.jpg)
सुरजने स्थानिक क्रिकेट संघात चांगली कामगिरी केल्याचे फळ त्याला मिळाले आहे. अन्वर शेख क्रिकेट अकॅडमी पुणे येथून आपल्या क्रिकेट खेळण्याची सुरूवात केल्यानंतर दोन वर्ष तिथेच सुरजने धडे घेतले. त्यानंतर क्लब ऑफ महाराष्ट्र यांच्या माध्यमातून सरावास सुरूवात केली. सलग तीन वर्ष या क्लब मधून तो क्रिकेट खेळत असे. त्यानंतर विविध संघ व मालिकांच्या माध्यमातून सुरजने चमकदार कामगिरी करत आपली फलंदाजी व गोलंदाजीची चमक निवडकर्त्यांना दाखवून दिली. अल्पावधीतच सुरज आपल्या फलंदाजीच्या जोरावर महाराष्ट्र संघापर्यंत मजल मारू शकला आहे.
2019 मध्ये झालेल्या डेक्कन ट्रॉफी स्पर्धेमध्ये सुरजने उत्कृष्ट फलंदाजी करत सर्वोत्तम फलंदाजीचा पुरस्कार मिळवला होता. कामगिरीत सातत्य ठेवल्याने सुरजची आता होऊ घातलेल्या बीसीसीआय अंतर्गत क्रिकेट सी. के. नायडु या स्पर्धांसाठी निवड करण्यात आली आहे. महाराष्ट्र संघासाठी निवडण्यात आलेला सुरज हा करमाळा तालुक्यातील एकमेव खेळाडू आहे. त्याने केलेल्या पुण्यातील ४२ चेंडुत १०६ धावा, नांदेड येथील ६० चेंडुत १४१ धावा, ८१ चेंडुत ११५, ५८ चेंडुत नाबाद ९९ धावा अशा खेळ्या लक्षणीय ठरल्या आहेत.