पंढरपूर - पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुका जाहीर होताच, पुणे पदवीधर मतदारसंघात राजकीय वातावरण तापायला सुरुवात झाली आहे. विविध पक्षांच्या नेत्यांनी निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी सुरू केल्याचे पहायला मिळत आहे. आता या निवडणुकीत वारकरी संप्रदायाने देखील उडी घेतली आहे. वारकऱ्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी हक्काचा प्रतिनिधी असावा, म्हणून वारकरी संप्रदायाने पुणे पदवीधर मतदारसंघात आपला उमेदवार उभा करण्याचा निर्णय घेतला असून, वारकरी संप्रदायाकडून निवडणुकीसाठी शेखर मुंदडा यांना पाठिंबा देण्यात आला आहे.
वारकरी पाईक संघ व वारकरी संप्रदाय युवा मोर्चाच्या वतीने पंढरपूरमध्ये बैठक घेण्यात आली. या बैठकीत उमेदवार म्हणून शेखर मुंदडा यांच्या नावाला एकमताने पाठिंबा देण्यात आला. अशी माहिती वारकरी पाईक संघाचे प्रवक्ते रामकृष्ण महाराज वीर यांनी दिली. पुणे मतदारसंघात वारी आणि वारकऱ्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी संप्रदायाचा हक्काचा प्रतिनिधी असावा, यासाठी संप्रदायातील तरुण सुशिक्षित पिढी पुढे यावी. आपल्या विचाराचा उमेदवार पदवीधर मतदारसंघात असावा, यासाठी शेखर मुंदडा यांना वारकरी संप्रदायाचा पाठिंबा असल्याचेही ते यावेळी म्हणाले.