सोलापूर - भारिप-बहुजन महासंघ व बहुजन वंचित आघाडी यांच्यातर्फे करमाळा तहसील कार्यालयासमोर घंटानाद, हलगीनाद मोर्चा व धरणे आंदोलन सुरु करण्यात आले आहे. तालुक्यातील आदिनाथ व मकाई सहकारी साखर कारखान्यांच्या कामगारांचे वेतन मिळावे व एफआरपीनुसार उसाचे पैसे द्यावेत, या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात येत आहे. तर ७ दिवस हे धरणे आंदोलन सुरू राहणार असल्याचे यावेळी आंदोलकांनी सांगितले.
वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष दशरथ कांबळे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरू करण्यात आले आहे. याबाबत जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनात म्हटले आहे, की श्री आदिनाथ व मकाई सहकारी साखर कारखान्यावर बागल गटाची एकहाती सत्ता आहे. मात्र, ३ वर्षांपासून कामगारांचे वेतन झालेले नाही. त्यामुळे कामगारांचे प्रपंच उध्वस्त झाले आहेत. कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे.
वारंवार मागणी करूनही कारखान्याचे अध्यक्ष व संचालक मंडळाने कामगारांच्या वेतनाकडे गांभीर्याने पाहिले नाही. ७ जून रोजी करण्यात आलेल्या भीक मांगो आंदोलनावेळी कारखान्याचे अध्यक्ष यांना संपर्क केला होता. मात्र, तेव्हा ते आले नाही. त्यामुळे आम्ही हे घंटानाद, हलगीनाद धरणे आंदोलन सुरू केले आहे, अशी माहिती दशरथ कांबळे यांनी दिली.