सोलापूर - ज्येष्ठ नेते सुधाकर परिचारक यांच्या अस्थीच्या अंतिम दर्शनासाठी प्रदक्षिणा मार्गावरील परिचारक वाडयासमोर अस्थिकलश ठेवण्यात आला होता. यावेळी सामाजिक, राजकीय, शिक्षण, सहकार क्षेत्रातील नेते, कार्यकर्त्यांनी उपस्थित राहून त्यांच्या अस्थी कलशाला फुले अर्पण करून आदरांजली वाहिली. जय श्री हरीच्या गजरात सुधाकर परिचारक यांच्या अस्थी चंद्रभागेत विसर्जन करण्यात आल्या.
पंढरपूर व माळशिरस तालुक्यात काही गावात बुधवारी अस्थिकलश अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात आले होते. श्रीपूर येथील पांडुरंग सहकारी कारखान्यावरुन वेगवेगळ्या ग्रामीण भागात अस्थिकलश दर्शनाचे नियोजन करण्यात आले होते. आठ गटनिहाय अस्थिकलशाचे नियोजन केले होते. यामधे पंढरपूर, देगाव, वाखरी, भाळवाणी, करकंब गटातील प्रत्येक 16 गावात अस्थिकलशाचे दर्शनासाठी ठेवण्यात आले होते. एका गावात 45 मिनिटे अस्थिकलशाचे दर्शन देण्यात आले. विविध गटातील अस्थिकलशाचे पंढरपूर येथील अर्बन बँकेत एकत्र करण्यात आल्या. त्यानंतर दुपारी 2 वाजाता चंद्रभागा नदीत या सर्व अस्थिचे विसर्जन करण्यात आले. यावेळी परिचारक कुटुंबाच्या वतीने मिलिंद परिचारक उपस्थित होते.
पंढरपूर तालुक्याच्या राजकारण, साखर कारखाना, सूत गिरणी अशा विविध सहकारी संस्थांवर पदे भूषिवलेल्या, माजी आमदार सुधाकर परिचारक (वय 84) यांचे कोरोनामुळे निधन झाले. पुणे येथील वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर प्रशासनाच्या नियमानुसार अंतिम संस्कार करण्यात आले.