सोलापूर- शहरातील प्रत्येक वार्डात ओपीडी सुरु करण्याची मागणी माजी मंत्री व आमदार सुभाष देशमुख यांनी सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडे केली आहे. शहरात कोरोनाचे रुग्ण वाढत चालले आहेत. अशा परिस्थितीमध्ये जास्तीत जास्त लोकांच्या आरोग्याची तपासणी होणे गरजेचे आहे. त्यासाठी प्रत्येक वार्डात ओपीडी सुरु करण्याची मागणी करण्यात आलीय.
पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी शुक्रवारी सोलापूरमध्ये येऊन आढावा बैठक घेतली. सोलापूर शहरातील डॉक्टरांची बैठक झाल्यानंतर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींची पालकमंत्र्यांनी घेतली. या बैठकीमध्ये सुभाष देशमुख यांनी पालकमंत्र्यांना निवेदन दिले. या निवेदनाद्वारे पालकमंत्र्यांकडे विविध मागण्या करण्यात आल्या.
सोलापुरात कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. वाढणारी रुग्ण संख्या रोखण्यासाठी तत्काळ उपायोजना करावी. जास्तीत जास्त स्वॅब टेस्ट कराव्यात, त्याचा अहवाल लवकर मिळावा, खासगी दवाखान्यात रुग्ण सापडल्यास दवाखाना सील ना करता तेथील डॉक्टरांना विश्वासात घेऊन काम करावे, अशा मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत.
बिगर रेशन कार्डधारकांनाही धान्य मिळावे, लॉकडाऊन काळात जप्त केलेल्या वाहनांबाबत योग्य तो निर्णय घ्यावा. वाहनधारकांकडून कमी दंड घेण्यात यावा. कोव्हिड सेंटरमध्ये विलगीकरण करण्यात आलेल्या व्यक्तींना योग्य त्या सुविधा पुरवाव्यात, विलगीकराणात एका व्यक्तीस एका खोलीची सोय करावी, यासह विविध मागण्या आ. देशमुख यांनी केल्यात.