सोलापूर - सोलापूर येथील स्वामी विवेकानंद योग धामच्या उद्घाटनासाठी राज्यपाल भगतसिंग कोशारी हे आज सोलापूर शहरात आले. छत्रपती शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास या विषयावर राज्यपाल भगतसिंग कोशारी यांनी वादग्रस्त वक्तव्य केले होते. यावरून संपूर्ण महाराष्ट्रात शिवप्रेमी आक्रमक झाले आहेत. राज्यपालांचा विरोध करत सर्वपक्षीय शिवप्रेमी सोलापुरातील आसरा चौक येथे जमले. संतप्त कार्यकर्त्यांनी राज्यपालांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न केला असून त्यांना काळे झेंडे दाखवले आहे. पण पोलिसांनी कडक बंदोबस्त लावत सर्व आंदोलकांना रोखून ठेवले आहे.
औरंगाबाद येथे राज्यपालांचे वक्तव्य-
स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव तसेच राजभाषा मराठी दिनाचे औचित्य साधून औरंगाबाद येथे आयोजित श्री समर्थ साहित्य संमेलनाचे उदघाटन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले. त्यावेळी बोलताना राज्यपाल कोश्यारी यांनी समर्थ रामदास आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचा दाखला देत एक वक्तव्य केलं होते.
राज्यपालांच नेमकं विधान काय आहे -
चाणक्यांशिवाय चंद्रगुप्ताला कोण विचारेल? समर्थांशिवाय शिवाजीला कोण विचारेल? शिवाजीला किंवा चंद्रगुप्ताला छोटं नाही म्हणत आहे मी. पण गुरुचं आपल्या समाजात मोठं स्थान असतो. छत्रपतींनी समर्थांना म्हटलं की, राज्य मला तुमच्या कृपेने मिळालंय. आपल्याकडे गुरुला गुरुदक्षिणा देण्याची परंपरा आहे. त्याच भावनेतून छत्रपती शिवाजी महाराज समर्थांना म्हणाले की, ‘या राज्याची चावी मी तुम्हाला देतो’ त्यावर समर्थ म्हणाले की, ‘ही राज्याची चावी मला कुठे देता. तुम्हीच याचे ट्रस्टी आहात”, असं वक्तव्य राज्यपाल कोश्यारी यांनी केले होते.
शिवप्रेमींना अटक -
राज्यपालांनी केलेल्या वक्तव्यावरून राज्यात संतापाची लाट शिवप्रेमीत उसळली आहे. यावरून राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना विविध स्तरावर विरोध केला जात आहे. सोलापुरात राज्यपाल येणार असल्याची माहिती पसरताच शिवप्रेमी आक्रमक झाले होते. राज्यपालांच्या विरोधासाठी आसरा चौक येथे सकाळी 9.30 वाजण्याच्या सुमारास शिवप्रेमी किंवा शिवभक्त एकवटून ताफा अडविण्याचा प्रयत्न सुरू केला. एकप्रकारे राज्यपालांना घेराव घालण्याचा प्रयत्न होता. मात्र, सोलापूर पोलिसांनी बरेकेट्स लावून आंदोलकांना अडवून ठेवले होते. त्यांचा ताफा जात असताना भगवे झेंडे दाखवून विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.