सोलापूर - सोलापुरात राज्य उत्पादन शुल्काच्या भरारी पथकाने मोठी कारवाई केली आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्याच्या सीमेवर विदेशी दारुच्या 890 पेट्या हस्तगत करून एकूण 76 लाख 82 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला ( Liquor Seized Solapur ) आहे. हा सर्व विदेशी दारूचा मद्यसाठा गोवा राज्य निर्मित आहे. धुलिवंदन आणि रंगपंचमी निमित्त सोलापुरात दारूची तस्करी राज्य उत्पादन शुल्क विभागाने रोखली आहे.
दारुची मागणी वाढली
होळी, धुलीवंदन आणि रंगपंचमीच्या निमित्ताने सोलापुरात मद्याची मागणी वाढली होती. वाढती मागणी लक्षात घेता दारुची अवैधरीत्या वाहतूक होण्याची शक्यता होती. त्यामुळे राज्य उत्पादन शुल्क, सोलापूर विभागाकडून विशेष भरारी पथके नेमण्यात आली होती. त्याच पार्श्वभुमीवर जत- सांगोला महामार्गावर सोनंद गावाच्या हद्दीत सहाचाकी कंटेनर क्र. MH-04-GR-7237 या मधून विदेशी दारुच्या एकूण 890 पेट्या जप्त केल्या.
76 लाख 82 हजारांचा मुद्देमाल हस्तगत
भरारी पथकाने तपासणी केली असता सदर कंटेनरमध्ये वाहनात एड्रीयल क्लासिक व्हिस्किच्या 750 मिली क्षमतेच्या 300 पेट्या, रॉयल स्टॅग विदेशी दारुच्या 180 मिली क्षमतेच्या 100 पेट्या, इंपेरियल ब्ल्यू विदेशी दारुच्या 180 मिली क्षमतेच्या 232 पेट्या, मॅक्डोवेल नं 1 व्हीस्की विदेशी दारुच्या 180 मिली क्षमतेच्या 258 पेट्या, असा 66 लाख 76 हजार रुपये किमतीचा दारूसाठा जप्त केला. तसेच, दोन मोबाईल व कंटेनर असा एकूण 76 लाख 82 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल कारवाईत जप्त करण्यात आला आहे.
आरोपींचा शोध सुरु
याप्रकरणी कंटेनरचा चालक ज्ञानेश्वर अशोक भोसले ( वय ३९ वर्षे, रा. पोखरापुर ता. मोहोळ) याच्या विरुद्ध महाराष्ट्र दारुबंदी कायदा 1949 या कलमांतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या गुन्ह्यात मुख्य आरोपी बापू उर्फ सोमनाथ तुकाराम भासले, बाळू भोसले, शेखर भोसले व कंटेनर मालकासह इतर आरोपी फरार आहेत. पोलीस त्यांचा शोध घेत असल्याची माहिती अधीक्षक नितीन धार्मिक यांनी दिली आहे.
हेही वाचा - Raju Shetti Decision : राजू शेट्टी महाविकास आघाडीतून बाहेर पडणार? 5 एप्रिल रोजी बैठकीत निर्णय