सोलापूर - महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत जिल्ह्यातील थकबाकीदार शेतकरी सभासदांचे आधार प्रमाणीकरण करून या योजनेचा शुभारंभ करण्यात आला. अतिरिक्त जिल्हाधिकारी संजीव जाधव यांच्याहस्ते या योजनेचा शुभारंभ करण्यात आला.
यावेळी दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रूप आणि माळशिरस तालुक्यातील वेळापूर येथील थकबाकीदार शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण करण्यात आले. मंद्रूप येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखेत झालेल्या या कार्यक्रमास जिल्हा उपनिबंधक कुंदन भोळे, तहसिलदार उज्ज्वला सोरटे, अग्रणी बँक व्यवस्थापक संतोष सोनवणे, सहाय्यक निबंधक आबासाहेब गावडे, बँक आफ इंडियाचे विश्वास वेताळ उपस्थित होते.
तर मंद्रूप येथील 104 तर वेळापूर येथील 194 पात्र शेतकऱ्यांची यादी पोर्टलवर असून त्यांचे आधार प्रमाणीकरण केले जाणार आहे. या याद्यामध्ये काही त्रुटी आढळल्यास त्यांची त्या-त्या स्तरावर निर्गती केली जाईल, असे अतिरिक्त जिल्हाधिकारी संजीव जाधव यांनी स्पष्ट केले. त्यांच्या हस्ते आधार प्रमाणीकरणाच्या पोच पावत्यांचे वितरणही करण्यात आले. त्याबरोबरच यावेळी नागुबाई कुंभार, भाग्यश्री कुमठाळे, पुंडलिक लोभे, सदाशिव जोडमुठे यांचा सत्कार करण्यात आला.
कर्जमुक्ती योजनेच्या अंमलबजावणीत कोणत्याही त्रुटी राहु नयेत, यासाठी प्रशासन सतर्क आहे. जिल्ह्यातील 80 हजार 786 थकबाकीदार शेतकरी सभासदांची जवळपास 771.62 कोटी रूपयांची कर्जमाफी झाली आहे. जिल्ह्यात एकूण 80 हजार 786 शेतकऱ्यांपैकी 79 हजार 311 शेतकऱ्यांची नावे पोर्टलवर अपलोड झाली आहेत. 28 तारखेपर्यंत याद्या उपलब्ध होतील, असेही जिल्हा उपनिबंधक भोळे यांनी यावेळी सांगितले.
जिल्ह्यातील उर्वरित पात्र थकबाकीदार शेतकरी सभासदांच्या याद्या 28 तारखेपर्यंत उपलब्ध केल्या जातील. या याद्या ग्रामपंचायत, तलाठी कार्यालय, विकास सोसायटी तसेच जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संबंधित शाखेत लावल्या जातील, असेही भोळे यांनी सांगितले.